दुर्धर आजारावर मात करण्यासाठी सरकार जनतेच्या पाठीशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 15:23 IST2017-12-25T15:22:01+5:302017-12-25T15:23:20+5:30
देवेंद्र फडणवीस : धुळ्यात खान्देश कॅन्सर सेंटर व राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचा शुभारंभ

दुर्धर आजारावर मात करण्यासाठी सरकार जनतेच्या पाठीशी
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : अलीकडे कॅन्सरचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या आजारावर उपचार करण्यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीत अनेक, गरीब, गरजू रुग्ण पैशांअभावी उपचार घेत नाही. मात्र, कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर मात करण्यासाठी सरकार गरीबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून आपल्या महाराष्टÑात पैशांमुळे उपचार होऊ शकले नाही, अशी परिस्थिती निर्माण होता कामा नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
धुळ्यात सोमवारी खान्देश कॅन्सर सेंटरचा भूमीपूजन सोहळा व राम सर्जिकल व मॅटर्निटी हॉस्पिटलचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम शहरातील छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिरासमोरील रस्त्यावर झाला. मंचावर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, रोहयो व पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे, खासदार ए. टी. पाटील, आमदार स्मीता वाघ, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास शर्मा, कॅन्सर सर्जरी विभाग प्रमुख डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ. बिना भामरे, डॉ. राहुल भामरे, डॉ. आरधना भामरे भाजपा जिल्हाध्यक्ष अनूप अग्रवाल, बबन चौधरी, हिरामण गवळी व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जगदीश देवपूरकर यांनी केले.
कॅन्सर आजारावर महात्मा फुले योजनेंर्गत मोफत उपचार
कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर सरकारतर्फे महात्मा फुले या योजनेंतर्गत मोफत उपचार केले जात आहे. यासाठी सेवाभावी संस्था, ट्रस्ट यांच्या सहकार्यातून ही योजना राबविली जात आहे. त्यामुळे उपचारासाठी पैसा नसेल, तर थेट आमच्याशी संपर्क साधावा, गरजूंना मोफत उपचार उपलब्ध करून दिले जातील, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे केले.
रुग्णांच्या चेह-यावरील हास्य हीच खरी संपत्ती
कॅन्सरवर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात पैसा लागतो. मात्र, गरजू रुग्णांना अल्प दरात उपचार करून देणे गरजेचे आहे. पैसा कमविण्यापेक्षा रुग्ण बरे होऊन त्यांच्या चेहºयावर हास्य फुलले पाहिजे. त्यांच्या चेहºयावरील हास्य हीच खरी संपत्ती असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.