धुळे - मुंबई येथील व्ही. एम. ज्वेलर्सचे दोन कर्मचारी विनय मुकेश जैन आणि किशन मोदी यांना बुधवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील वीर सावरकर चौकात बसमधून खाली उतरल्यावर लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करत सोन्याने भरलेली बॅग हिसकावून नेली. बॅगेत तीन किलो सोन्याचे दागिने असल्याचे ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. विनय जैन आणि किशन मोदी हे दोघे सोन्याच्या दागिन्यांचे सॅम्पल घेऊन मुंबई येथून शहादा येथील व्यापाऱ्यांना ते दाखवण्यासाठी गेले होते. बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते बस क्रमांक एमएच ४० एन ९०२१ ने धुळ्याकडे निघाले. रात्री आठ वाजून दहा मिनिटांनी ते धुळ्यातील वीर सावरकर चौकात बसमधून उतरले. बसमधून उतरताच एका दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला.
तीन दरोडेखोरांपैकी एकाने हवेत गोळीबार करत विनय जैन यांच्या हातातून सोन्याची बॅग हिसकावून घेतली. त्यानंतर ते तिघे दरोडेखोर श्री एकविरा देवी मंदिरासमोरून बिलाडी मार्गे फरार झाले. ही घटना इतक्या वेगाने घडली की, दरोडेखोरांचे चेहरेही पाहता आले नाहीत, त्यांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या,असे पीडित कर्मचाऱ्यांनी सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिस दलात खळबळ उडाली. पोलिस अधीक्षक श्रीकांत देवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे श्रीराम पवार यांच्यासह पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. विशेष म्हणजे, दरोडेखोर देवपूर पोलिस ठाण्यासमोरूनच बिलाडी मार्गे फरार झाले.
दरम्यान, पोलिसांचे पथक वीर सावकर चौकात ज्याठिकाणी हवेत गोळीबार झाला, तेथे गोळ्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच दरोडेखोर ज्या मार्गाने पळाले, त्यामार्गावर पोलिस पथक रवाना झाले आहे. रात्री उशिरापर्यंत देवपूर पोलिस स्टेशनला पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या उपस्थितीत त्या दोघी कर्मचाऱ्यांची विचारपूस करून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.