दहिवद येथे १५ लाखाची रोकडसह सोनसाखळी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:36 IST2021-07-31T04:36:40+5:302021-07-31T04:36:40+5:30

शिरपूर : तालुक्यातील दहिवद येथील नरेंद्र भगवान पाटील यांच्या बंद घराचे चक्क ४ कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेली ...

Gold chain stolen with Rs 15 lakh in cash at Dahivad | दहिवद येथे १५ लाखाची रोकडसह सोनसाखळी चोरी

दहिवद येथे १५ लाखाची रोकडसह सोनसाखळी चोरी

शिरपूर : तालुक्यातील दहिवद येथील नरेंद्र भगवान पाटील यांच्या बंद घराचे चक्क ४ कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लॉकरमध्ये ठेवलेली रोकड १५ लाखासह साडेपाच तोळ्याची सोनसाखळी सुध्दा लांबविल्याची घटना घडली़ दरम्यान, पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी भेट, श्वान पथक, व फिंगर प्रिंट पथकास पाचाराण केले़ मात्र सकाळी जोरदार पाऊस झाल्यामुळे श्वान पथकाचा काहीच उपयोग झाला नाही, जवळपासच घुटमळले़

३० रोजी पहाटे ३ ते ४ वाजेच्या सुमारास दहिवद येथील नरेंद्र भगवान चव्हाण-पाटील यांचे ग्रामपंचायत पाठीमागील ब्रिटिश काळातील दुमजली घरात चोरट्यांनी डल्ला मारला़ नरेंद्र पाटील हे सध्या गेल्या महिनाभरापासून शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात परिवारासह राहतात़ अधून-मधून ते दहिवद येथे ये-जा करतात़ गेल्या २-३ महिन्यापूर्वी त्यांनी शेतीचा व्यवहार केला होता़ आलेली रक्कम तेव्हापासून ब्रिटिशकालीन घरातील एका लॉकरमध्ये ठेवली होती़ त्या सोबत त्यांच्या पत्नीची साडेपाच तोळे वजनाची सोनसाखळी सुध्दा ठेवली होती़ मागील घर पडक्या अवस्थेत होते ते पाडून नव्याने बांधकामासह पुन्हा ते नवीन शेती घेणार असल्यामुळे सदरची रक्कम त्यांनी तेथेच ठेवली होती़

त्यांचे दोघे मुले औरंगाबाद येथे नोकरीला लागल्यामुळे त्यांची कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू होती़ हे काम आटोपल्यानंतर सदर रक्कम बँकेत ठेवणार होते़ मात्र त्यापूर्वीच चोरट्यांनी त्या रकमेवर डल्ला मारल्याचे त्यांनी सांगितले़ ब्रिटिशकाळात यापूर्वी कधी या हवेलीतून चोरी झाली नाही आता काय होईल या समजात ते होते़

हवेलीच्या पुढे गेट असून त्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी प्रवेश मिळविला़ त्यानंतर मुख्य दरवाजाला दोन कुलूपे असून ते चोरट्यांनी टॅमीच्या साहाय्याने तोडलेली दिसतात़ बंद घर असल्यामुळे कोणीच नव्हते, त्यामुळे चोरट्यांनी आरामशीपणे सर्व पाहणी करून लॉकरमध्ये ठेवलेल्या एका डब्यातून ही रक्कम व सोनसाखळी चोरून नेली़ लॉकर मात्र चोरट्यांनी न तोडता किल्लीच्या सहाय्याने उघडलेली दिसतेो

३० रोजी पहाटे ५़ २० वाजेच्या सुमारास गावातील पोलीस पाटलाने घराचे कुलूप तोडलेले असल्याचे नरेंद्र पाटील यांना मोबाईलने कळविले़ ते देखील काही मिनिटातच घटनास्थळी पोहचले़ त्यांनी लॉकरमध्ये पाहणी केली असता पैशांचा डबाच चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले़ घटनेची माहिती गावातील पोलीस पाटलांनी सांगवी पोलिसांना कळविली त्यानंतर गावात वाऱ्यासारखी बातमी पसरल्यामुळे अनेकांनी गर्दी केली होती़ त्यानंतर पोलीस पथक देखील काही वेळातच दाखल झाले़ घटनेतील रक्कम मोठी असल्यामुळे फिंगर प्रिंट पथक व श्वान पथकास देखील कळविण्यात आले़ ते देखील काही वेळात दाखल झाले़ मात्र सकाळी ८ वाजता दहिवद गावात जोरदार पाऊस झाला़ त्यानंतर श्वानपथक आले, त्यामुळे घराच्या डाब्या बाजूने पाठीमागील १५-२० मीटरपर्यंत जाऊन घुटमळले़

गावातील एका इसमाने चोरट्यांना पाहिले असल्याची घटनास्थळी चर्चा आहे़ मात्र तो घाबरला आहे़ पोलीस देखील त्याची चौकशी करीत असल्याचे सांगण्यात आले़ आरोपी ३ चोरटे असल्याचे सांगण्यात येते़

अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, डीवायएसपी अनिल माने, सपोनि सुरेश शिरसाठ यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली़ एलसीबीचे पथक देखील आले होते़ सांगवी पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले़ याच दिवशी नरेंद्र पाटील यांच्या घरासमोरील भगवान चौधरींचे घर आहे़ मात्र ते दुसऱ्या मजल्यावर परिवारासह राहतात, खालचा मजला बंद असतो़ चोरट्यांनी त्या बंद मजल्याचे देखील कुलूप तोडले मात्र तेथे काहीच मिळून आले नसल्याचे सांगण्यात आले़

Web Title: Gold chain stolen with Rs 15 lakh in cash at Dahivad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.