गावोगावी फिरून स्वस्त धान्याची खरेदी, मालपूर परिसर; धान्याच्या बदल्यात दिला किराणा माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:40 IST2021-09-05T04:40:33+5:302021-09-05T04:40:33+5:30
मालपूर, ता. शिंदखेडा येथे ४० रुपये आदली या दराने गहू व तांदूळ हे व्यापारी विकत घेतात. त्या बदल्यात साबण, ...

गावोगावी फिरून स्वस्त धान्याची खरेदी, मालपूर परिसर; धान्याच्या बदल्यात दिला किराणा माल
मालपूर, ता. शिंदखेडा येथे ४० रुपये आदली या दराने गहू व तांदूळ हे व्यापारी विकत घेतात. त्या बदल्यात साबण, चहा पावडर, जिरे, हळद यासह अन्य किराणा माल देतात. लाभार्थींना मिळणाऱ्या या अन्नधान्याचा फायदा बाहेरगावाहून खास वाहनाने व्यापारी येथे येऊन घेत आहेत. रेशनचा गहू, तांदूळ सर्रासपणे खरेदी करून त्या बदल्यात पैशांऐवजी इतर किराणा माल ग्राहकांना देतात. मात्र यातून सर्वसामान्य ग्राहकांचीच लूट होत असल्याचे निदर्शनास येते. हा माल थेट काळ्या बाजारात विक्रीला जात असून जिल्ह्यात हे एक मोठे रॅकेट असून याचा भंडाफोड पुरवठा विभागाने करून त्याला पायबंद घातला पाहिजे. अन्यथा किराणा वस्तूंचे आमिष दाखवून ही लूट सुरूच राहील व खरे लाभार्थी कायमस्वरूपी वंचितच राहण्याची शक्यता आहे. दरमहा रेशन वाटप झाल्यानंतर येथे हे धान्य खरेदीसाठी वाहनांची रीघ लागते.
कोरोना काळात गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये या उदात्त हेतूने शासनाकडून मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र काही व्यापारी किराणा मालाच्या बदल्यात हे स्वस्त धान्य थेट काळ्या बाजारात विक्री करीत आहेत. यातून खरे गरजू लाभार्थी अजूनही या धान्यापासून वंचित असल्याचे समजते. यामुळे पुरवठा विभागाने वंचित असलेल्या कुटुंबीयांना शिधापत्रिका देऊन त्यांना या योजनेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
गरजू आणि गरीब कुटुंबांना दोन घास अन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारच्यावतीने मोफत धान्य पुरविले जात आहे. दर महिन्याला लाभार्थी स्वत धान्य दुकानावर जाऊन हक्काचे धान्य उचलतात. मात्र काही व्यापारी गावोगावी फिरून किराणा मालाच्या बदल्यात हे धान्य खरेदी करून ते काळ्या बाजारात विक्री करतात. या प्रकारामुळे ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा गरजूंनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्यांचे पोट भरले आहे त्यांना देण्यापेक्षा सरकारने सरकारने आमचाही विचार करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.