मुलांना वेळ द्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 11:48 IST2019-07-31T11:47:48+5:302019-07-31T11:48:03+5:30
दोंडाईचा : स्वामी विवेकानंद स्कूलमध्ये आयोजित कार्यक्रमात बापुसाहेब रावल

मुलांना वेळ द्या, त्यांच्या समस्या जाणून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क
दोंडाईचा : दररोजच्या जीवनात आपण कितीही व्यस्त असा पण पालक या नात्याने आपण मुलांना किमान रोज एक तास द्या, त्यांना नेमक्या कोणत्या समस्या आहेत. हे जाणून घ्या. त्यांना वेळ दिल्यास त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, मानसिक व शारीरिक विकास साधता येईल. अभ्यासासोबत मैदानी खेळ सुध्दा महत्वाचे आहेत. त्याशिवाय बालपण अपुर्णच आहे, असे प्रतिपादन माजी आमदार बापूसाहेब रावल यांनी केले.
दोंडाईचा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये वार्षिक पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा माजी आमदार बापूसाहेब रावल होते. तर व्यासपीठावर पालक शिक्षक असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्राचार्या सुरेखा राजपूत, अनिता जयसिंगाणी, ज्योत्सना मेहता, मुमताज बोहरी आदी उपस्थित होते.
जळगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यात साई राजपूत, मनिष राजपूत, जुगल राजपूत, हिंमाशु गिरासे यांचा समावेश होता तर राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकाविलेल्या क्रिष्णा थोरात, चंचल अग्रवाल, विशाखा सुर्यवंशी यांचाही गौरव करण्यात आला. यावेळी वृक्षाची रोपे देत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सुरेखा राजपूत यांनी केले. स्लाईड शो साठी रियाज काझी, अनिल माळी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन जयश्री खारकर, राजश्री पाटील यांनी केले.