दिव्यांग बांधवांना हक्काचा निधी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:34 IST2021-05-17T04:34:28+5:302021-05-17T04:34:28+5:30
धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दिव्यांग बांधवांसाठी राखीव पाच टक्के निधी त्वरित खर्च करावा आणि प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण ...

दिव्यांग बांधवांना हक्काचा निधी द्या
धुळे : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दिव्यांग बांधवांसाठी राखीव पाच टक्के निधी त्वरित खर्च करावा आणि प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण करावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
याबाबत शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. कोरोनासह लाॅकडाऊनचीदेखील सर्वच घटकांना झळ बसली आहे. सर्वाधिक गैरसोय अंध, दिव्यांग बांधवांची झाली आहे. या घटकांना मदतीची खऱ्या अर्थाने गरज आहे. नको त्या कामांची देयके जलद गतीने अदा करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी दिव्यांग बांधवांचा ५ टक्के निधी खर्च करावा. इतर कामांसाठी निधी उपलब्ध असताना दिव्यांगांचा राखीव निधी नेमका जातो तरी कुठे, असा प्रश्न शिवसेनेने निवेदनात उपस्थित केला आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करण्याचे आदेश द्यावे. या कामासाठी त्यांना टाइम लिमिट द्यावे. लसीकरण केंद्रांवर दिव्यांग बांधवांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदन देताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी, किरण जोंधळे, प्रफुल्ल पाटील, मनोज मराठे, चंद्रकांत म्हस्के, विलास चाैधरी, देवराम माळी, गुलाब माळी, संजय वाल्हे, भटू गवळी, केशव माळी, पंकज मराठे आदी उपस्थित होते.