आशा सेविकेच्या माध्यमातून बालिकेला मिळाली ‘आई’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 11:58 IST2020-03-05T11:57:58+5:302020-03-05T11:58:31+5:30
प्रेरणा : सुरजा माळ या दुर्गम भागात राहणाऱ्या चिमा चौधरी आशासेविकेने पदरमोड करीत कुपोषित बालिकेला दिले जीवदान

आशा सेविकेच्या माध्यमातून बालिकेला मिळाली ‘आई’
आबा सोनवणे।
आॅनलाइन लोकमत
साक्री : ‘हम दो हमारे दो’ अशी लहान कुटुंबाची व्याख्या असतानाही त्यांचेही पालन-पोषण न करणाºया सुसंस्कृत समाजाला चिमा मनोज चौधरी या आशा सेविकेने चपराक लगावली आह.आदिवासी समाजातील एका महिलेने आपल्या मनाची श्रीमंती दाखवून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
या महिलेची प्रेरणादायक कहाणी ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत साक्री तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात राहणारी सुरजा माळ या गावातील आशा सेविका चिमा मनोज चौधरी यांनी आई नसलेल्या मुलीचे पालनपोषण केले आहे. याच गावातील भारती चैत्राम चौधरी या महिलेचा प्रसुतीच्यावेळी मृत्यू झाला होता. तिला झालेली मुलगी कुपोषित होती. अशा परिस्थितीत सदर मुलीच्या वडिलांनी या मुलीला बेवारस सोडून काढता पाय घेतला. त्यामुळे मुलीचे काय असा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असताना याच गावातील आशा सेविका चिमा चौधरी याच्यातील आई जागृत झाली. लहान बाळाचे हाल तिला पहावले नाही. तिने शेवटी त्या मुलीला आपल्या घरी नेले. तिची सुश्रुषा केली.
त्या मुलीचं नाव तिने ‘राजश्री’ असे ठेवले आज ती मुलगी तिच्या कुटुंबातील एक सदस्य झाली आहे. पाच वर्षे वयाची राजश्री आता अंगणवाडीमध्ये जाऊ लागली आहे. पाचवर्षाची होईपर्यंत तिची विचारपूस करायला तिचे वडील आले नाहीत. शेवटी माझे हे तिसरे अपत्य समजून तिच्या पतीनेही तिचा स्वीकार केला. चौधरी दाम्पत्याला एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांचेही पालन-पोषण या आ शा सेविका उत्तम रित्या करताहेत. एका आदिवासी समाजातील कमी शिकलेली महिला आज समाजात आदर्श म्हणून उभी राहिली आहे. तिच्या या कार्याची दखल आरोग्य विभागाने घेऊन तिचा सत्कारही करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे साक्री पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जी.टी. सूर्यवंशी तसेच उपसभापती अॅड. नरेंद्र मराठे यांनीही या महिलेला आर्थिक मदत देऊ केली आह. आठ मार्चला महिला दिन मोठ्या धुमधडाक्यात साजरा होईल. त्यावेळेस या धूमधडाक्यात महिला दिन साजरा करणाऱ्यांना ही ‘आशा’ दिसली तर बरे होईल. या मुलीचे पालन-पोषण करताना चिमा चौधरींना ज्या हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या त्या शब्दा पलीकडे आहेत. साक्री तालुक्यातील या सिंधुताई समाजधुरीणांच्या नजरेत येतील का हा खरा प्रश्न आहे .खºया अर्ताने चिमा चौधरी या अनाथांची माता बनली आहे.