घोडदे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:55 IST2019-12-11T11:55:35+5:302019-12-11T11:55:55+5:30
परस्परविरोधी फिर्याद : १३ जणांवर गुन्हा

घोडदे येथे दोन गटात तुंबळ हाणामारी
आॅनलाइन लोकमत
कासारे (जि.धुळे) : दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना साक्री तालुक्यातील घोडदे आणि चिखलीपाडा गावात घडली़ याप्रकरणानंतर साक्री पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने एकत्रित १३ जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला़ यावेळी वातावरण तणावपुर्ण झाले होते़
शेतातील जागेच्या वाद उफाळून आला़ त्यातून लोखंडी रॉड, काठी आणि हाताबुक्याने मारहाण करण्यात आल्याने यात जीवन रमेश क्षिरसागर (४१, रा़ गोपालनगर, पिंपळनेर) यांना दुखापत झाली़ ही घटना ८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली़ या मारहाणीत महिला आल्याने तिलाही मारहाण करत तिचा विनयभंगही करण्यात आल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती़ यावेळी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटल्याने नुकसान झाले आहे़
याप्रकरणी जीवन रमेश क्षीरसागर यांनी साक्री पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी फिर्याद दिली. त्यानुसार, जयवंत विलास क्षिरसागर, किशोर जयवंत क्षिरसागर, रुपाली किशोर क्षिरसागर, हिरा जयवंत क्षिरसागर, साहेबराव शंकर घरटे, मनोहर साहेबराव घरटे, योगिता दादाजी घरटे, दादाजी सुकदेव घरटे यांच्यासह अन्य संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे़ दुसऱ्या गटाकडून एका महिलेने फिर्याद दाखल केली़ त्यानुसार, मागील भांडणाची कुरापत काढून मारहाण करण्यात आली़ मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले़ हाताबुक्याने मारहाण करण्यात आली़ ही घटना साक्री तालुक्यातील चिखलीपाडा गावात सोमवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी जीवन रमेश क्षिरसागर, विजय गोरख क्षिरसागर, कमलेश विजय क्षिरसागर, सुनंदा विजय क्षिरसागर, गोरख विश्राम क्षिरसागर या संशयितांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला़