गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढला, आता मोजा ८७५ रुपये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:42 IST2021-08-20T04:42:18+5:302021-08-20T04:42:18+5:30
शहरी भागात राहणाऱ्या महिलांना मात्र पर्याय नाही. शहरात सरपण विकत घ्यावे लागते. वखारीवर जळाऊ लाकडे महाग मिळतात. किंबहुना महिन्याकाठी ...

गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी वाढला, आता मोजा ८७५ रुपये!
शहरी भागात राहणाऱ्या महिलांना मात्र पर्याय नाही. शहरात सरपण विकत घ्यावे लागते. वखारीवर जळाऊ लाकडे महाग मिळतात. किंबहुना महिन्याकाठी गॅसच्या दरापेक्षा अधिक किमतीची लाकडे लागतात. त्यामुळे चूल पेटविणेदेखील परवडणारे नाही. भाडेतत्त्वाच्या घरात राहणाऱ्या गृहिणींना भिंती आणि छत खराब होईल म्हणून घरमालकाच्या भीतीने चूल पेटविता येत नाही.
आठ महिन्यात १८० रुपयांची वाढ
महिना दर (रुपयात)
जानेवारी ६९४
फेब्रुवारी ७९४
मार्च ८१९
एप्रिल ८०९
मे ८१९
जून ८२७
जुलै ८५०
ऑगस्ट ८७५
सबसिडी बंद, दरवाढ सुरूच
गेल्या वर्षी मे महिन्यापासून शासनाने स्वयंपाकाच्या गॅसवरील सबसिडी बंद केली आहे.
परंतु दरवाढ मात्र सातत्याने सुरूच आहे. ऑगस्ट महिन्यात गॅसच्या दरात २५ रुपयांची वाढ झाली.
फेब्रुवारीमध्ये एकाच महिन्यात तीनवेळा दरवाढ झाल्याने गॅस १०० रुपयांनी महागला.
छोट्या सिलिंडरच्या दरातही वाढ
छोट्या सिलिंडरच्या दरातही ५ रुपयांची वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
बहुपयोगी असलेला आणि सोबत नेता येणारा हा सिलिंडर आता ३१५ रुपयांना भरून मिळतो.
५ किलो गॅस असलेला हा सिलिंडर सर्वसामान्य फारसा वापरत नाहीत. परंतु काही प्रमाणात मागणी आहे.
पिकनिकसाठी किंवा लांब पल्ल्याच्या वाहनचालकांना स्वयंपाकासाठी उपयोगी ठरतो.
व्यावसायिक सिलिंडर पाच रुपयांनी स्वस्त
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मात्र कपात केल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला.
या सिलिंडरच्या दरात ५ रुपयांची कपात केली आहे. सध्या त्याचा दर १,६६६ रुपये आहे.
शहरात चुली कशा पेटवायच्या
शहरात सामाजिक प्रतिष्ठा फार महत्त्वाची असते. शिवाय चूल पेटविल्यावर निघणारा धूर शेजारी सहन करतीलच असे नाही. धुरामुळे घराच्या भिंती आणि छत डागाळण्याचीही भीती असते. - प्रमिला चौधरी, गृहिणी
ग्रामीण भागात ओट्यावर किंवा अंगणातदेखील चूल पेटविता येते. परंतु शहरात तसे करणे शक्य नाही. शिवाय मुलांची शाळा घरातच सुरू असल्याने धुरामुळे त्यांना त्रास होईल. वखारीत लाकडेही महाग मिळतात. - भारती सोनवणे, गृहिणी