गणेश मूर्तीच्या दरांमध्ये ७ टक्यांपर्यंत वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 11:46 IST2019-07-31T11:45:24+5:302019-07-31T11:46:20+5:30
छोट्या मूर्तींचे बुकींग झाले पूर्ण

गणेश मूर्तीच्या दरांमध्ये ७ टक्यांपर्यंत वाढ
आॅनलाइन लोकमत
धुळे : विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला आता एक महिना बाकी आहेत. मात्र यावर्षी आषाढ महिन्यात झालेला समाधानकारक पाऊस, शिवाय आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमुळे गणेशोत्सव गेल्यावर्षाच्या तुलनेत जल्लोषात साजरा होण्याचे संकेत आहे. त्यामुळे आतापासूनच काही मुर्तींकारांकडे बुकींग पूर्ण झालेले आहे. मजुरी तसेच इतर साहित्याचे दर वाढल्याने यावर्षी ५ ते ७ टक्यांपर्यंत मूर्तींच्या किमतीत वाढ होईल असे गणेश मूर्तीकारांनी सांगितले.
श्रावण महिना सुरू होताच विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू होते. त्यातच गणेशोत्सवाचे सर्वांनाच वेध लागलेले असतात. यावर्षी हा उत्सव २ ते १२ सप्टेंबर २०१९ या कालावधीत साजरा होणार आहे.
गणरायाच्या आगमनाला आता एक महिन्याचा अवकाश असला तरी कारागिरांकडे मूर्ती बनविण्याचा कामाला वेग आलेला आहे. आता प्लॅस्टर आॅफ पॅरिसद्वारेच मूर्ती तयार करण्यावर भर दिला जात आहे.
डिसेंबरपासूनच कामाला सुरवात
डिसेंबर-जानेवारी महिन्यापासून मूर्ती तयार करण्याच्या कामाचा ‘श्रीगणेशा’ करण्यात येतो. मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत कडक उन असल्याने, मूर्तीची माती वाळण्यास मदत होत असल्याने, अनेक मूर्तीकार हे फेब्रुवारीपर्यंत मूर्ती बनविण्याचे काम पूर्ण करण्यास प्राधान्य देत असतात.
बुकींग पूर्ण!
आकर्षक मूर्ती व कार्यकर्त्यांना हवी असलेली मूर्ती कारागिरांकडून तयार करून घेणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. त्यामुळे शहरातील मूर्ती विक्रेत्यांकडे आतापासूनच मूर्ती विकत घेण्यासाठी बुकिंगला सुरुवात झाली आहे. काही कारागिरांकडे तर मूर्तींची बुकींग पूर्ण झालेली आहे. ज्यांनी मूर्ती बुकींग केली त्यांनाच पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगितले. शहरासह मालेगाव, चाळीसगाव व तसेच लगतच्या गुजरात राज्यातूनही गणेश मूर्ती नोंदणीसाठी कार्यकर्ते शहरात येत असतात.
कच्चा मालाच्या
किंमती वाढल्या
जीएसटी लागू झाल्यामुळे गणेश मूर्ती साकारण्यासाठी लागणारे प्लॅस्टर आॅफ पॅरिस, रंग, माती, नारळाच्या चुट्ट्या व इतर कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे गणेश मूर्तींच्याही किंमती ५ ते ७ टक्यांनी वाढणार आहे. घरगुती गणपतीच्या मूर्तीपेक्षा मोठ्या गणेश मूर्तींसाठी गणेशभक्तांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
भोलाशंकर मूर्तीला मागणी
यावर्षीही मंडळांकडून विविध प्रकाराच्या मूर्तींना मागणी होऊ लागली आहे. पुणे येथील कसबा पेठच्या गणपतीला १०० वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त या नवसाच्या कसबापेठ गणपतीच्या मूर्तींना मागणी वाढलेली आहे. त्याचबरोबर सध्या राममंदिराचा प्रश्नही चर्चेत असल्याने मंदिर वहि बनायेंगे अशा स्वरूपात गणपतीच्या मागे राममंदिराचे चित्र असलेल्या गणेशमूर्तीलाही मागणी आहे. भोलेशंकरच्या रूपात असलेली गणेश मूर्ती, चिंचपोकळीचा राजा, लालबागचा राजा आदी प्रकारच्या मूर्ती तयार करण्यात आल्याची माहिती मूर्तीकार गणेश खरे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.