धुळे : कुस्तीखेळ दिवसेंदिवस सुधारत असल्यामुळे आणि कुस्ती स्पर्धेत खेळू नये या कारणावरुन लाकडी दांडकासह काहीतरी घातक शस्त्राने तरुण पहिलवानवर हल्ला केल्याची घटना देवपुरातील नवीन स्मशानभुमीजवळील रस्त्यावर १ जानेवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. शिवीगाळ करीत कुस्ती कसे खेळतो, जीवंत राहशील तेव्हाच खेळशील असे बोलत मिस्तरी काम करणारा समीर खान सलीम खान पठाण (२३, रा. लाला सरदार नगर, देवपूर धुळे) याला दोन जणांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी लाकडी दांडका आणि काहीतरी घातक शस्त्राने वार केल्यामुळे समीर याला दुखापत झाली. यात त्याच्या पाठीसह कानाला, डोक्याला, पोटासह हातावर सपासप वार झाल्याने यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी २ जानेवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजता देवपूर पोलीस ठाण्यात समीर खान सलीम खान पठाण याने फिर्याद दाखल केल्याने शाहीद खान मुक्तार खान पठाण (रा. जुने धुळे) आणि जुबेर खान इस्माईल खान पठाण (रा. लाला सरदार नगर, देवपूर, धुळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला.
भविष्यातील पहिलवानवर शस्त्राने केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 22:14 IST