शोकाकुल वातावरणात शहीर जवानावर अंत्यसंस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST2021-07-29T04:35:41+5:302021-07-29T04:35:41+5:30
बहीण भावाने फोडला हंबरडा बुधवारी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास शहीद नीलेश महाजन यांचे पार्थिव साेनगीर येथील राजकुमार नगरमधील त्यांच्या ...

शोकाकुल वातावरणात शहीर जवानावर अंत्यसंस्कार
बहीण भावाने फोडला हंबरडा
बुधवारी सकाळी ९:४५ वाजेच्या सुमारास शहीद नीलेश महाजन यांचे पार्थिव साेनगीर येथील राजकुमार नगरमधील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात आले. पार्थिव पाहून बहीण जोतीबाई व भाऊ दीपक महाजन यांनी पार्थिवची पेटी पाहताच हंबरडा फोडला. भाऊ व बहीण व नातेवाइकांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. यावेळी पार्थिव फुलांनी सजविलेला ट्रॅक्टर व ठेवण्यात आले होते. अंत्ययात्रेच्या पुढे दोनशे मीटर लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन तरुण चालत होते. यावेळी त्याच्या राहत्या घरापासून. तेथून पोलीस ठाणेसमोरून गावाकडे एन. जी. बागूल हायस्कूलच्या पाठीमागून भिलाटीतून इंदिरानगर साईबाबा मंदिर व पुढे मरीमाता मंदिराकडून अंत्यसंस्कार ठिकाणीपर्यंतच्या मार्गावर रांगोळी व फुलांच्या पाकळ्यांची सजविण्यात आले होते. तसेच जागोजागी तिरंगा ध्वज, भावपूर्ण श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. याप्रसंगी अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांनी देशभक्तीपर घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. तसेच पार्थिवच्या समोर चालत असलेल्या डीजे, बँडच्या पथकाने देशभक्तीपर गीते वाजवीत संपूर्ण यात्रा संचारली होती.
यावेळी यात्रेत सोनगीर गावातील व गावोगावीवरून आलेल्या तरुणाई, महिला, व ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अंत्ययात्रा अंत्यसंस्कार स्थळी पोहोचली. यावेळी उपस्थित सर्वपक्षीय पदाधिकारी, सैनिक दलातील आजी-माजी सैनिक, प्रशासनातील अधिकारी व गावकऱ्यांनी शहीद नीलेश महाजन यांना पुष्पचक्र व फुले, हार वाहून श्रद्धांजली वाहिली. यावेळी शहीद जवान महाजन यांचे चुलत भाऊ योगेश महाजन यांनी अग्निडाग दिला.
मान्यवरांची उपस्थिती जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, तहसीलदार गायत्री सौंदाणे, आमदार जयकुमार रावल, शिवसेना जिल्हाप्रमुख हिलाल माळी, भाजपचे जिल्हाप्रमुख नारायण पाटील, माजी सभापती अरविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, पंकज कदम, कामराज निकम, सोनगीरच्या सरपंच रुखमाबाई ठाकरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शामलाल मोरे, माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन, भाजपचे तालुका उपाध्यक्ष आर. के. माळी, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर चौधरी आदी उपस्थित होते.
दुकाने उत्स्फूर्तपणे बंद
आज देशभक्त वीर जवान नीलेश महाजन यांना अखेरचा निरोप द्यायचा म्हणून सकाळपासूनच गावातील दुकानदार, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उत्स्फूर्तपणे स्वतःहून बंद ठेवून अंत्ययात्रेसाठी सहभागी झाले होते.
ग्रामपंचायतचे सहकार्य
शाहीद जवान नीलेश महाजन हे मूळचे सोनगीर येथील नसले तरी काही वर्षांपासून सोनगीर येथील रहिवाशी झाले होते. महाजन यांचे भाऊ दीपक व नातेवाईक यांनी सोनगीर येथे जवान नीलेश महाजन यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतल्याने या सगळ्याची जबाबदारी सोनगीर ग्रामपंचायत व प्रशासन व पदाधिकारी यांनी घेतली आहे. शहीद जवानावर आपल्या गावात अंत्यसंस्कार होणार असल्याचा अभिमान बाळगून सर्व जण अंत्यसंस्काराच्या तयारीला लागले होते.
जागा विकसित करणार
नीलेश महाजन यांचे अंत्यसंस्कार झाले त्या ठिकाणची सुमारे एक एकर जागा सोनगीर ग्रामपंचायत विकसित करणार आहे. या ठिकाणी सैन्य भरतीचा सराव करण्यासाठी मैदान, वृक्षारोपण, बसण्यासाठी बाक व कुपन तयार केले जाणार आहे.