रस्त्यावर मस्ती, जान नही सस्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 13:20 IST2020-03-01T13:20:20+5:302020-03-01T13:20:58+5:30
संतप्त प्रतिक्रीया । ट्रकच्या टपावर बसून धोकेदायक प्रवास

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
कुसुंबा/नेर : सुरत-नागपूर या राष्टÑीय महामार्ग क्रमांक ६ वर अवैध प्रवासी वाहतूक नित्याचीच बाब बनली आहे. ट्रकमध्ये व ट्रकच्या कॅबीनवर बसून नागरिक जीवघेणा प्रवास करताना दिसून येत आहेत. यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कुसुंबा गावातून सुरत-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. या महामार्गावर सातत्याने वाहनांची वर्दळ सुरु असते. या महामार्गावर नेहमीच धोकेदायक वाहतूक सुरु असल्याचे दिसून येते. यामुळे अनेकदा येथे अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र, याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.
एकिकडे शासन वाहन चालकांसाठी विविध नियम घालून देत आहे. सुरक्षित प्रवासाबद्दल विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. मात्र, सर्व नियम धाब्यावर बसवून चक्क ट्रकच्या टपावरच प्रवासी बसवून प्रवास सुरु असल्याचे दिसून येत आहे. हा प्रवास जीवघेणा ठरु शकतो, याचे वाहन चालकांना सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. तसेच प्रवाशांनाही स्वत:च्या जीवाची पर्वा नसल्याचे यातून दिसून येत आहे. संबंधित विभागाने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
नेरला दुचाकीस्वारांची स्टंटबाजी
नेर गावातील मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणांकडून स्टंटबाजी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे दुर्घटना घडू शकते. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे धुमस्टाईल वेगाने वाहने चालविणाºया दुचाकीस्वारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
गावातील काही टवाळखोर तरुण सकाळी, दुपारी, सायंकाळी, रात्री १० वाजेपर्यंत भरधाव वेगाने दुचाकी वाहने चालवतात. लहान बालके, ज्येष्ठ नागरिक रस्ता ओलांडत असतांना भरधाव वेगाने जोरजोरात हॉर्न वाजवून टवाळी करीत असल्याचे दिसून येत आहे. गावात सीसीटिव्ही कॅमेरे नसल्याने अशा वाहनांची नोंद घेता होत नाही. गावातील मुख्य रस्त्यावर बेजाबबदारपणे वाहने चालवून नागरिकांना अडथळा निर्माण केला जात आहे. यातून अनेकदा ज्येष्ठांनी याबाबत जाब विचारल्यास तरुणांकडून उद्धटपणे उत्तरे मिळतात. तुमच्याकडून जे होईल ते करा, असे म्हणण्याइतपत या तरुणांची हिंमत धजावली आहे. दुचाकीस्वारांच्या या स्टंटबाजीमुळे लहान बालके, ज्येष्ठ नागरिक, पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळे वेळीच या तरुणांना आवर घालण्याची गरज असून पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे.