लोकसहभागातून रात्रीतून केली विंधन विहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 12:33 IST2019-03-24T12:32:42+5:302019-03-24T12:33:36+5:30
खुडाणेत तीव्र पाणीटंचाई : दुष्काळी स्थितीत ग्रामस्थांना दिलासा

dhule
निजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाण्याअभावी गावातील नळ पाणीपुरवठा काही दिवसांपासून बंद पडला आहे. यामुळे खुडाणे ग्रामपंचायतीची तारांबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून सोमवारी रात्री तातडीने विंधन विहीर करण्यात आली. यामुळे गावास काहीसा दिलासा मिळाला आहे.
दुष्काळी स्थितीमुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन करताना खुडाणे ग्रामपंचायत प्रशासनाची तारांबळ उडालेली बघून गावकऱ्यांनी एकत्र येऊन वर्गणी गोळा केली आणि कुपनलिका करण्यासाठी हातभार लावला. बोअरवेलला बऱ्याच प्रमाणात पाणी लागल्याने या भागातील पाणी समस्या काही अंशी सुटणार आहे.
यंदा सर्वत्र दुष्काळाचे सावट असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी हाल होताना दिसत आहेत. खुडाणे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर व बोअरवेल आटल्याने गावात पाणीपुरवठा कसा करावा, या विवंचनेत ग्रामपंचायत प्रशासन असताना गावातील वार्ड क्र. चार मधील सामाजिक कार्यकर्ते देवाजी वंजारी व जेष्ठ नागरिकांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून निधी जमा केला. त्यात ग्रामपंचायतीने देखील रकमेची भर टाकली व बोअरवेल केला. सुदैवाने या बोअरवेलला बºयापैकी पाणी लागल्याने गावाचा पाणीप्रश्न सुटण्यास काहीअंशी मदत होणार आहे.
गावातील लोकांनी फक्त ग्रामपंचायतीवर निर्भर न राहता लोकसहभागातून केलेल्या मदतीबद्दल खुडाणेचे सरपंच प्रतिनिधी पराग माळी यांनी गावकऱ्यांचे आभार मानले आहेत.