साक्री तालुक्यात मोफत रेशनकार्डची मोहीम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:34 IST2021-09-13T04:34:35+5:302021-09-13T04:34:35+5:30
धुळे : साक्री तालुक्यातील आदिवासी बांधवांना शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र आदिवासी ...

साक्री तालुक्यात मोफत रेशनकार्डची मोहीम सुरू
धुळे : साक्री तालुक्यातील आदिवासी बांधवांना शिधापत्रिका मिळवून देण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र आदिवासी बांधवांनी रास्त भाव दुकानदार किंवा तहसील कार्यालय साक्री, अप्पर तहसीलदार पिंपळनेर यांच्या कार्यालयात अर्ज सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी केले आहे.
अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना शासनाकडून विनामूल्य नवीन केशरी शिधापत्रिका देणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, विभक्त शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकेत नाव समाविष्ट करणे, कमी करणे आदी कामांसाठी भरावयाचे शुल्क एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, धुळे यांच्याकडून न्यूक्लियस बजेट योजनेतून अदा करण्यात येणार आहे.
आवश्यक कागदपत्रे अशी
पात्र लाभार्थ्यांनी आपल्या गावातील स्वस्त धान्य दुकानदाराकडे आवश्यक कागदपत्र सादर करून पोहोच प्राप्त करून घ्यावी. नवीन शिधापत्रिकेसाठी आवश्यक कागदपत्रे (फक्त अनुसूचित जमातीकरिता) : शिधापत्रिकेमधील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत, उत्पन्नाचा दाखला, वीज बिल, घरपट्टी पावती, नमुना क्रमांक ८ चा उतारा (यांपैकी एक), बँक पासबुकाची झेरॉक्स प्रत, घर भाड्याचे असल्यास घरमालकाचे सहमतीपत्र, सहमती दिल्यास नमुना क्रमांक ८ चा उतारा जोडावा, प्रकल्प कार्यालयाच्या शुल्काबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे.
विभक्त शिधापत्रिकेसाठी पूर्वीचे पती, पत्नीचे नाव कमीचे दाखले, उत्पन्नाचा दाखला, वीज बिल, घरपट्टीची पावती नमुना क्रमांक ८ चा उतारा यांपैकी एक सादर करावे. बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत, घर भाड्याचे असल्यास सहमतीपत्र, सहमती दिल्यास नमुना क्रमांक ८ चा उतारा जोडावा, प्रकल्प कार्यालयाचे शुल्काबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे, शिधापत्रिकेमधील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत.
नाव कमी, समाविष्ट करण्यासाठी मूळ शिधापत्रिका, विहित नमुन्यातील नाव कमी करण्याचा अर्ज, पूर्वीच्या रेशन कार्डमधून नाव कमी केल्याचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. आधार कार्ड झेरॉक्स प्रतही हवी.
दुय्यम शिधापत्रिकेबाबत पूर्वीची जुनी, जीर्ण झालेली शिधापत्रिका जमा करणे आवश्यक आहे किंवा शिधापत्रिका हरविली असल्यास शंभर रुपयांच्या मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र करून देणे बंधनकारक राहील. शिधापत्रिकेमधील सर्व सदस्यांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत आवश्यक असते.
या मोहिमेंतर्गत कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. याबाबतचे शुल्क प्रकल्प कार्यालय, धुळे यांच्याकडून अदा होणार आहे. त्यामुळे कोणीही शुल्क देऊ किंवा घेऊ नये, असे आवाहन साक्रीचे तहसीलदार चव्हाणके, पिंपळनेरचे अप्पर तहसीलदार विनायक थवील यांनी केले आहे.