औषधी वनस्पती लागवडीत तामसवाडीतील शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 21:40 IST2020-12-06T21:40:14+5:302020-12-06T21:40:39+5:30
पुण्याच्या कंपनीतील पती-पत्नीविरुध्द गुन्हा दाखल

औषधी वनस्पती लागवडीत तामसवाडीतील शेतकऱ्यांची फसवणूक
धुळे : तालुक्यातील तामसवाडी येथील दोघा शेतकऱ्यांची पुण्यातील एका कंपनीने फसवणूक केली. कंपनीने औषधी वनस्पती लागवडीसाठी प्रेरीत करुन प्रत्यक्षात उत्पादन घेतल्यानंतर या शेतकऱ्यांना पैसेच न दिल्याने सोनगीर पोलीस ठाण्यात पुण्याच्या कंपनीतील दोघाविरुध्द सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पुणे येथील एका कंपनीच्या प्रतिनिधींनी मार्च २०१८ मध्ये धुळे तालुक्यातील तामसवाडी येथील शेतकरी शिवाजी जर्नादन पाटील आणि विशाल प्रभाकर बोरसे या दोघांना शतावरी वनस्पती लागवडीसाठी प्रेरीत केले. लागवडीसाठी रोपे कंपनी पुरविणार असल्याने मे २०१८ मध्ये या दोघा शेतकऱ्यांनी रोपांचे पैसे भरल्यानंतर कंपनीने रोपे पुरविली. त्यानुसार दोघा शेतकऱ्यांनी शतावरीची लागवड केली. जानेवारी २०२० मध्ये सदर रोपांची काढणी करायची असल्याने या दोघांनी कंपनीला सुचित केले असता त्यांनी या दोघांना तुम्हीच कापणी करा आणि एकत्रित माल कंपनीला पोहचवा, असे सांगितल्याने मार्च २०२० मध्ये शतावरीची कापणी करण्यात आली. त्यानंतर स्वत:चे वाहन करुन या दोघांनी तो माल कंपनीला पोहचही केला. मात्र त्यानंतर कंपनीने पैसे देण्यास टाळाटाळ केली. अगदीच तगादा लावल्यानंतर कंपनीकडून या दोघांना धनादेश देण्यात आला. त्यात शिवाजी पाटील यांना १६ लाखांचा तर विशाल बोरसे यांना १३ लाख ५८ हजार रुपयांचा धनादेश मिळाला. मात्र सदरचा धनादेश हा बँकेत भरला असता कंपनीने त्यांचे खातेच बंद केल्याचे आढळून आले. त्यानंतर या दोघांनी कंपनीचे कार्यकारी संचालक ऋषिकेश लक्ष्मण पाटकर आणि त्यांच्या पत्नी मधुरा यांच्याशी संपर्क साधून पैशांची मागणी केली. त्यांनी उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने दोघाविरुध्द संशयावरुन सोनगीर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.