धुळे महापालिकेच्या आर्थिक कारभाराचे चार वर्षांचे एकत्रित सखोल लेखापरीक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST2021-07-30T04:37:49+5:302021-07-30T04:37:49+5:30
महापालिकेच्या आर्थिक कारभाराबद्दल अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत़ मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता असल्याची विरोधकांकडून सातत्याने ओरड केली जात आहे़ ...

धुळे महापालिकेच्या आर्थिक कारभाराचे चार वर्षांचे एकत्रित सखोल लेखापरीक्षण
महापालिकेच्या आर्थिक कारभाराबद्दल अनेक आरोप-प्रत्यारोप होत आहेत़ मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता असल्याची विरोधकांकडून सातत्याने ओरड केली जात आहे़ या पार्श्वभूमीवर माजी आमदार अनिल गोटे यांनी स्थानिक निधी लेखापरीक्षण उपविभाग औरंगाबाद यांच्याकडे ४ एप्रिल २०२१ रोजी पत्र देऊन धुळे महापालिकेच्या आर्थिक कारभाराचे सखोल लेखापरीक्षण करण्याची मागणी केली होती़ त्याचा पाठपुरावादेखील करण्यात आलेला होता़ त्या पत्रानुसार, राज्य सरकारने महापालिकेच्या २०१६-१७ ते २०१९-२० असे चार वित्तीय वर्षाचे एकत्रित लेखापरीक्षण करण्याचे ठरविले आहे़ त्यानुसार, लेखापरीक्षण अधिकाऱ्यांची नियुक्ती करून सविस्तर परीक्षण करण्याचे लेखी आदेश दिले आहेत़
लेखापरीक्षणासाठी लेखापरीक्षक पथकनियुक्त करण्यात आले आहे़ त्यात लेखापरीक्षण पथकाचे प्रमुख जि. ऊ. बर्वे आहेत़ त्यांच्यासह सहायक लेखापरीक्षक अधिकारी भ. निं. पगार, सु़ पा़ भोये, चव्हाण अशा चार अधिकाऱ्यांचा या पथकात समावेश आहे़
लेखापरीक्षण पथकाने २०१६-१७ ते २०१९-२० या चार वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची सविस्तर तपासणी करीत त्यात आर्थिक अनियमितता आढळून आल्यास त्याचा सविस्तर आक्षेप अहवालात नोंदविण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे़