धुळे/कापडणे - तालुक्यातील मुंबई - आग्रा महामार्गावर सरवड फाटयाजवळ झालेल्या आयशर गाडीने धडक दिल्याने बोरीसकडून धुळ्याकडे मोटारसायकलने जाणारे दोन चुलत देवरे बंधु जागीच ठार झाल्याची घटना रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. तर दुसरी घटना नागपूर - सुरत महामार्गावर मुकटी गावाजवळ घडली. त्यात किराणा घेण्यासाठी पायी गावात येत असतांना मोठा ट्रेलर अंगावरुन गेल्याने ३५ वर्षीय पिता संजय कुंभार आणि तीन वर्षाचा मुलगा राजेंद्र हे दोघे ठार झाले. ही घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.मुंबई - आग्रा महामार्गावर घडलेल्या घटनेत तालुक्यातील बोरीस येथील रहिवासी कैलास आत्माराम देवरे (वय ५२ )व राजेंद्र भानुदास देवरे (५०) हे दोघे मोटारसायकलवरून धुळ्याकडे जात असताना सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान सरवड फाटयावर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली. धडक दिल्यानंतर वाहन शिरपूरच्या दिशेकडे पसार झाले. अपघातात दोन्ही देवरे बंधू हे जागीच ठार झाले. भाऊबंदकीत मयत दोघांचे भावाचे नाते होते.सदर गुन्ह्याची नोंद सोनगीर पोलीस स्टेशन येथे रात्री उशिरापर्यंत होणार आहे अशी माहिती सोनगीर पोलिस कर्मचाऱ्यांनी दिली आहे.मयत कैलास आत्माराम देवरे यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे सुरेश आत्माराम देवरे यांचे ते भाऊ होत. मयत राजेंद्र भानुदास देवरे यांच्या पश्चात पत्नी मुले काका असा परिवार आहे.ट्रेलरने चिरडल्याने पिता-पुत्राचा मृत्यूतर दुसऱ्या घटनेत नागपूर - सुरत महामार्गावर मुकटी गावात माऊली नगरात राहणारे संजय हिरामण कुंभार (वय ३५) व त्यांचा तीन वर्षाचा मुलगा हेमंत संजय कुंभार हे दोघे गावात पायी येत होते. महामार्गावर आल्यावर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आर.जे. ०४ जीबी ९५७४ क्रमांकाचे मोठ्या ट्रेलरने त्यांना मागून धडक धडक दिली. दोघे पिता - पुत्र खाली पडले. त्यांच्या अंगावरुन ट्रेलरची चाके गेल्याने दोघे पिता - पुत्र काही क्षणातच जागीच गतप्राण झाले.मयत संजय कुंभार हे गावात मातीची भांडी तयार करुन ती विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. तीन मुलीनंतर झालेल्या आपल्या एकुलत्या एक मुलासोबत ते किराणा घेण्यासाठी घरुन निघाले होते. अवघ्या काही मिनिटातच झालेल्या अपघातात दोघांना मृत्यू झाला. घराचा कर्ता पुरुष आणि एकुलता एक मुलगा मेल्याने मयत संजय कुंभार यांची पत्नी व तीन मुलींवर दु:खाचा डोंगर कोसळले आहे.
महामार्गावर झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 22:55 IST