वाहन आडवे लावून जबरी चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 21:46 IST2020-12-02T21:43:03+5:302020-12-02T21:46:55+5:30
साक्री रोडवरील घटना, २ लाख १९ हजाराचा मुद्देमाल लांबविला

वाहन आडवे लावून जबरी चोरी
धुळे : पिकअप वाहनाच्या पुढे वेगाने येऊन कार आडवी लावून मारहाण करीत २ लाख १९ हजाराचा मुद्देमाल चौघांनी लंपास केला. ही घटना साक्री रोडवरील इच्छापुर्ती मंदिराच्या पुढे १ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता घडली. लुट केलेली पिकअपसह पितापुत्रांनी आपली सुटका करीत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर धुळ्यापासून इच्छापुर्ती गणपती मंदिराच्या पुढे एक पिकअप वाहन जात असताना त्याच्यापुढे जावून कार आडवी लावण्यात आली. पिकअप मधील प्रेम रामचंद्र मोटवानी आणि त्यांचा मुलगा भावेश यांना मारहाण करण्यात आली. या चौघा लुटारुंनी एमएच १८ एए ४००२ क्रमांकाचे पिकअप वाहन, ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, १४ हजार रुपयाची रोकड असा एकूण २ लाख १९ हजाराचा मुद्देमाल त्यांच्यासह लांबविला. थोड्या अंतरावर गेल्यानंतर बापबेट्यांनी आपली सुटका करुन घेतली. यानंतर स्वत:ला सावरत प्रेम मोटवानी यांनी २ डिसेंबर रोजी पहाटे फिर्याद दिल्याने चार जणांविरुध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला.