२० लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:36 IST2021-01-23T04:36:58+5:302021-01-23T04:36:58+5:30
धुळे- अन्न व औषध विभागातील कमी मनुष्यबळामुळे जिल्ह्यातील २० लाख लोकांची अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. अन्न व औषध ...

२० लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर
धुळे- अन्न व औषध विभागातील कमी मनुष्यबळामुळे जिल्ह्यातील २० लाख लोकांची अन्न सुरक्षा धोक्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनातील पदे रिक्त आहेत. तसेच कार्यरत अधिकाऱ्यांकडे नंदूरबार व जळगाव जिल्ह्याचाही अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून अधिकाऱ्यांच्या कामावर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनावर मोठी जबाबदारी आहे. मात्र मनुष्यबळ अत्यंत कमी असल्यामुळे २० लाख लोकांची अन्न सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरात असलेल्या मुख्य कार्यालयाच्या ठिकाणी अन्न व औषध या दोन्ही विभागांना स्वतंत्र सहायक आयुक्त लाभले आहेत. मात्र त्यांच्याकडे इतरही जिल्ह्यांचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. अन्न विभागाचे सहायक आयुक्त संतोष कांबळे यांच्याकडे नंदूरबार जिल्ह्याचा अतिरिक्त प्रभार आहे तर औषध विभागाचे सहायक आयुक्त विजय जाधव यांच्याकडे जळगावचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. अन्न निरीक्षकाची दोन पदे भरण्यात आली आहेत. तर औषध निरीक्षकांच्या दोन पदांपैकी एक पद भरले असून एक पद रिक्त आहे. लिपिक संवर्गातील पदेही रिक्त आहेत. कमी मनुष्यबळामुळे मेडिकल्सची तपासणी तसेच हॉटेलमधील खाद्यपदार्थांची तपासणी देखील वेळेवर होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मेडिकल्सच्या तपासणीवर परिणाम -
जिल्ह्यात १६८२ मेडिकल आहेत. तर केवळ एक औषध निरीक्षक आहेत. जिल्ह्यात औषध निरीक्षकाची दोन पदे मंजूर आहेत. मात्र एक पद रिक्त असल्यामुळे एकाच औषध निरीक्षकावर मेडिकल तपासणीची मदार आहे. मनुष्यबळाच्या अभावामुळे मेडिकल दुकानांच्या नियमित होणाऱ्या तपासणीवर परिणाम झाला आहे. तसेच नवीन तपासण्यांची संख्याही कमी झाली आहे.
हॉटेल तपासणीतही अनियमितता -
जिल्ह्यात परवानाधारक तसेच नोंदणीकृत एकूण ५८० इतकी हॉटेल्स आहेत तर अन्न निरीक्षक केवळ दोन आहेत. यापूर्वी जिल्ह्यात अन्न निरीक्षकांची चार पदे होती. मात्र दोन पदे व्यपगत झाल्याने दोन निरीक्षकांवरच हॉटेल तपासण्याची मदार आहे. हॉटेल तपासणी अनियमितपणे होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोर्टकचेऱ्यांच्या फेऱ्यात वेळ जातो वाया
अन्न व औषध विभागाशी संबंधित १५० प्रकरणे विविध न्यायालयात सुरू आहेत. त्या खटल्यांमध्येच अधिकाऱ्यांचा बराचसा वेळ वाया जातो. दोंडाईचा, शिंदखेडा, साक्री याठिकाणी काही प्रकरणे दाखल आहेत तर उच्च न्यायालयातही काही खटले सुरू आहेत. प्रतिबंधित अन्नपदार्थ व सुरक्षित अन्नपदार्थ यासंदर्भात प्रकरणे न्यायालयात सुरू आहेत.
प्रतिक्रिया -
तर अतिरिक्त ताण कमी होईल -
पुरेसे मनुष्यबळ मिळाल्यास अतिरिक्त कामाचा ताण कमी होईल. मेडिकल व हॉटेलच्या तपासण्यांची संख्या वाढण्यास मदत होईल. इतर जिल्ह्यांचाही प्रभार असल्यामुळे कामावर परिणाम होत आहे. प्रभार कमी केल्यास धुळे जिल्ह्यावरच लक्ष केंद्रित करता येईल.
विजय जाधव, सहायक आयुक्त औषध विभाग
जिल्ह्यातील मेडिकल्स - १६८२
जिल्ह्यातील हॉटेल्स - ५८०
औषध निरीक्षक - १
अन्न निरीक्षक - २