कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने मृत्यूचे प्रमाणही वाढले होते. कोरोना बाधित गंभीर रुणांना व्हेंटिलेटर महत्त्वाचे असून, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते. दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर वापराअभावी रुग्णालयाच्या कोपऱ्यात धूळखात पडले आहे. व्हेंटिलेटरच व्हेंटिलेटरवर पडल्याने रुग्णालय व्हेंटिलेटरवर असल्याचे बोलले जात आहे.
आरोग्यमंत्री माने यांनी धुळ्याला व पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दोडाईचाला घेतलेल्या बैठकीत व्हेटिलेटरचा मुद्दा चर्चेत आला होता. व्हेंटिलेटर सुरू करण्याचे बैठकीत सूचित करण्यात आले होते. धुळ्याला
शासकीय रुग्णालयात काही
व्हेंटिलेटर कार्यान्वित झाले आहेत. परंतु दोडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील दोन्ही
व्हेंटिलेटर वापराविना धूळखात पडले आहेत.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत म्हणजे गेल्या नऊ महिन्यांपूर्वी जिल्हा आरोग्य अधिकारी व शासनाकडे उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर कार्यान्वित होणेसाठी स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्र दिल्याचे सागण्यात आले. परंतु शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. उपजिल्हा रुग्णालयात शासकीय व सामाजिक संस्थेकडून मिळालेले पाच व्हेंटिलेटर आहेत. व्हेंटिलेटर वापरासाठी मॉनिटर, टेक्निशियन पाहिजे आहेत. व्हेंटिलेटर, डॉक्टर व कर्मचारी आवश्यक आहेत. त्यासाठी २४ तास ऑपरेटर पाहिजेत. व्हेंटिलेटर इन्स्टॉलेशन करण्यासाठी टेक्निशिअनची आवश्यकता आहे. कोरोना बाधित रुग्ण व मृत्यू वाढत असतानाच आरोग्य विभाग व वरिष्ठ आरोग्य अधिकारी यांनी गांभीर्याने सदर बाब लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर वापरात आणण्यासाठी आवश्यक कर्मचारी देणे आवश्यक आहे.
उपजिल्हा रुग्णालयातून यापूर्वी अस्वस्थ रुग्ण लगेच धुळ्याला पाठवून दिले जात असल्याने व्हेंटिलेटरची गरज भासली नाही .परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अस्वस्थ रुग्णांना बाहेरून प्राणवायू द्यावा लागत आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटरअभावी मृत्यूचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. मार्च - एप्रिल महिन्यात दोडाईचात सुमारे ६० जण मृत्यूमुखी पडले आहेत.
दोडाईचा उपजिल्हा रुग्णालयात अस्वस्थ व कोविड केअर सेंटरला सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांवर उपचार होत आहेत. दोन्ही ठिकाणी बाहेरून प्राणवायू पुरविण्याची सोय आहे. उपजिल्हा रुग्णालयात अस्वस्थ रुग्णांना व्हेंटिलेटरचा वापर आवश्यक आहे. परंतु व्हेंटिलेटर वापरासाठी प्रशिक्षित कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकारी नसल्याने ते धूळखात पडल्याचे सांगण्यात येत आहे. वास्तविक आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या
बैठकीनंतर या विषयाला चालना मिळणे आवश्यक होते. शासन व प्रशासनाने फक्त औपचारिक बैठकीचे सोपस्कार पार पाडल्याची चर्चा आहे. व्हेंटिलेटर वापरावयाचे प्रशिक्षण जुजबी ज्ञान असणाऱ्यास दिले, तर उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर वापरात येऊन रुग्णांचे प्राण वाचू शकतात. उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा रुग्णांवर उपचार करण्यास अडचणींचा ठरला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येणार, याचा अंदाज असूनही कोणतीही पूर्वतयारी झाली नाही. जुलै - ऑगस्टला तिसरी लाट येण्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. तरीही रुग्णालयांच्या कार्यपद्धती सुधारणा होत नसल्याने रुग्णांवरील उपचार रामभरोसे असल्याचे समजावे लागेल.
जिल्हा शल्यचिकित्सक व विभागीय वैद्यकीय अधिकारी यांनी लवकरात लवकर उपजिल्हा रुग्णालयातील व्हेंटिलेटर कार्यान्वित करावेत, अशी मागणी होत आहे.