पाच जणांवर दंगलीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 21:32 IST2020-07-04T21:32:15+5:302020-07-04T21:32:56+5:30
धुळे : सिंचन विहिरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार केल्याच्या रागातून दंगल माजविल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...

dhule
धुळे : सिंचन विहिरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहाराची तक्रार केल्याच्या रागातून दंगल माजविल्याप्रकरणी पाच जणांविरुध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
साक्री तालुक्यातील घोडदे गावात शुक्रवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान ही घटना घडली़
सिंचन विहिरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी जयवंत सखाराम पाटील याच्याविरुध्द साक्री पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती़ याचा राग आल्याने जयवंत सखाराम पाटील, मनोहर जयवंत पाटील, योगेश दिलिप क्षिरसागर, कमलेश दिलिप क्षिरसागर, दिलिप सखाराम क्षिरसागर सर्व रा़ घोडदे यांनी अनिल पांडुरंग क्षिरसागर आणि त्यांच्या आतेभावाला लाठ्याकाठ्यांच्या सहाय्याने मारहाण करीत शिवीगाळ केली़
याप्रकरणी अनिल क्षिरसागर यांच्या फिर्यादीवरुन वरील पाच जणांविरुध्द भादंवी कलम १४३, १४७, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक के़ एम़ दामोदर करीत आहेत़
दरम्यान, या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला होता़ सिंचन विहिरीच्या कामातील गैरव्यवहारावरुन अनेक दिवसांपासून वाद सुरू होता़ या वादाचे रुपांतर दंगल होण्यात झाले़ काही सुज्ञ गावकऱ्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला़ परंतु त्याचा उपयोग झाला नाही़