कोथिंबीर शेतकऱ्याकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:39 IST2021-08-27T04:39:07+5:302021-08-27T04:39:07+5:30
धुळे - पावसाळ्यामुळे भाजीपाल्याचे भाव कमी झाले आहेत. मात्र ग्राहकांना चढ्या भावानेच खरेदी करावी लागत आहे. कोथिंबीर शेतकऱ्याला दहाला ...

कोथिंबीर शेतकऱ्याकडून दहाला पाच, ग्राहकाच्या पदरात दहाला दोन !
धुळे - पावसाळ्यामुळे भाजीपाल्याचे भाव कमी झाले आहेत. मात्र ग्राहकांना चढ्या भावानेच खरेदी करावी लागत आहे. कोथिंबीर शेतकऱ्याला दहाला पाच जुड्या याप्रमाणे खरेदी केली जाते. तर ग्राहकांना दहाला दोन याप्रमाणे विक्री होत आहे.
उन्हाळ्याच्या तुलनेत सध्या भाजीपाला काही प्रमाणात स्वस्त झाला आहे. शेतकऱ्याला कवडीमोल दरात भाजीपाल्याची विक्री करावी लागत आहे. पण ग्राहकांना त्याचा फारसा फायदा होताना दिसून येत नाही. त्यांना शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेपेक्षा दुप्पट दाम द्यावा लागत आहे. चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे. भाव मिळत नसल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील भाजीपाला उपटून फेकला आहे.
भावात एवढा फरक का ?
शेतकऱ्यांना कमी भावात भाजीपाला व्यापाऱ्यांना विकावा लागतो. ग्राहकांना मात्र जास्त भावात खरेदी करावी लागते. बाजार समितीतून भाजीपाला खरेदी करताना आडत, हमाली व वाहतूक खर्च लागत असल्याने भाव वाढत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांचा खर्चही निघेना ...
योग्य भाव मिळत नसल्याने भाजीपाला लागवड करावी किंवा नाही असा प्रश्न पडतो. बाजार समितीत शेतकऱ्याकडून भाजीपाला कमी दराने खरेदी केला जातो. नंतर त्याच भाजीपाल्याची विक्री जास्त भावाने होते. बाजार समितीने यात हस्तक्षेप करावा.
अरुण पाटील, शेतकरी
चांगला भाव मिळत नसल्याने शेतातील कोथिंबीर काढून टाकावी लागली. उत्पादन चांगले झाले की भाव मिळत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागते. सरकारने शेतकऱ्याला फायदा होईल, असे धोरण ठरवायला पाहिजे,
- दीपक महाले, शेतकरी
ग्राहकांना परवडेना
पूर्वी पावसाळ्यात भाजीपाल्याचे भाव कमी व्हायचे. आता मात्र इतर ऋतूंप्रमाणेच भाव पावसाळ्यातही असतात. वाढलेल्या महागाईमुळे आधीच जगणे कठीण झाले आहे. त्यात भाजीपालाही महाग होत असल्याने आर्थिक गणित बिघडले आहे.
- नीलेश चौधरी
महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे. यापूर्वी शंभर रुपयात आठवड्याचा बाजार यायचा. आता त्यापेक्षा दुप्पट पैसे मोजावे लागतात. महागाई कमी झाली पाहिजे.
- सोनाली वाघ
कोणत्या भाजीला काय भाव ?
वांगी
शेतकऱ्यांचा भाव - १०
ग्राहकाला मिळणारा भाव - २५
टोमॅटो
शेतकऱ्यांचा भाव ५
ग्राहकाला मिळणारा भाव १५
भेंडी
शेतकऱ्यांचा भाव ७
ग्राहकाला मिळणारा भाव २०
चवळी
शेतकऱ्यांचा भाव १६
ग्राहकाला मिळणारा भाव ४०
पालक
शेतकऱ्यांचा भाव ११
ग्राहकाला मिळणारा भाव २५
कोथिंबीर
शेतकऱ्यांचा भाव ८
ग्राहकाला मिळणारा भाव २५
मेथी
शेतकऱ्यांचा भाव ३३
ग्राहकाला मिळणारा भाव ६०
हिरवी मिरची
शेतकऱ्यांचा भाव १३
ग्राहकाला मिळणारा भाव ३०
पत्ता कोबी
शेतकऱ्यांचा भाव ७
ग्राहकाला मिळणारा भाव १५
फुल कोबी
शेतकऱ्यांचा भाव ९
ग्राहकाला मिळणारा भाव २०
दोडके
शेतकऱ्यांचा भाव १३
ग्राहकाला मिळणारा भाव ३०