गरताड यात्रेत दगडफेक, पाच जखमी
By Admin | Updated: February 27, 2017 00:46 IST2017-02-27T00:46:46+5:302017-02-27T00:46:46+5:30
तमाशात गाणे लावण्याचा वाद : पोलीस बंदोबस्त तैनात, तणावपूर्ण शांतता

गरताड यात्रेत दगडफेक, पाच जखमी
धुळे : तालुक्यातील गरताड गावात यात्रोत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या तगतराव मिरवणुकीत रविवारी रात्री गाणे लावण्यावरून वाद झाला. यावरून दोन गटात तुफान दगडफेक झाली़ तसेच लाठ्याकाठ्यांनीही वार झाला़ त्यात पाच ते सहा जण जखमी झाले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात तणावपूर्ण शांतता आहे़
गरताड येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीच्या दुसºया दिवशी दरवर्षी यात्रोत्सव साजरा केला जातो. यंदाही साजरा करण्यात आला. यानिमित्त गावात लोकनाट्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले़ होत़े त्यात कार्यक्रमापूर्वी हजेरीचा कार्यक्रम होऊन लोकनाट्यातील कलावंत व तगतरावाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत एका समाजाबद्दल असलेले गाणे लावण्यात आले. ते गाणे लावण्यास काही समाजबांधवानी विरोध केला. मात्र काहींनी ते गाणे पारंपरिक असल्याने लावण्याचा आग्रह धरला. त्यानंतर गावातील काहींनी मध्यस्थी करीत वाद मिटविला़ विरोध करणाºयांना मिरवणुकीतून घरी पाठविण्यात आले़ मात्र मिरवणुकीतून घरी पाठविण्यात आलेले संबंधित काही जणांना घेऊन आले. त्यांच्याकडे लाठ्या-काठ्या होत्या. त्यांनी मिरवणुकीतील लोकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातून गोंधळ उडाला. तसेच दोन ेगटात तुफान दगडफेकही सुरू झाली़
त्यात कौतिक तानकू भिल, रामदास रावण भिल, देवीदास दादाभाऊ भिल, शरद चंद्रसिंग भिल या चौघांसह इतरही काही जण जखमी झाले.
दरम्यान गावात पथदिव्याची तोडफोडही करण्यात आल्याचे समजते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्यासह पोलीस फौजफाटा दाखल झाला होत़ घटनास्थळी तणावपूर्ण शांतता असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़ याबाबत रात्री उशिरापर्यंत मोहाडी पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता़ काही जखमींना हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते़