कडधान्य चोरीप्रकरणी ट्रकसह पाच ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 22:43 IST2020-06-22T22:42:59+5:302020-06-22T22:43:22+5:30
रस्त्यातच धान्य हडप : शहर पोलिसात तक्रार

कडधान्य चोरीप्रकरणी ट्रकसह पाच ताब्यात
धुळे : जळगावहून मुंबई येथे वाहतूक करण्यासाठी दिलेले कडधान्य रस्त्यातच हडप केल्याचा प्रकार समोर आला आहे़ याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पाच संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे़
जळगाव येथून १७ जून रोजी एमएच १९ झेड २५१६ या ट्रकमधून जळगाव येथील भापसे अण्णा ट्रान्सपोर्ट येथून मुगडाळ, उडीदडाळ आणि चवळी या कडधान्याच्या ३९६ गोण्या (कट्टे) हे वाशी (नवी मुंबई) येथील विविध व्यापाऱ्यांकडे पोहच करण्यासाठी दिले होते़ १७ जून रोजी रात्री ११ ते १८ जून रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान एरंडोल ते धुळे येथील सुरत बायपास रस्त्यावर यातील ७९ गोण्या गहाळ झाल्या होत्या़ याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर ट्रकमालक जाबाज खान यांनी १९ जून रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने ट्रक चालक विकास चौधरी आणि सहचालक गुरुदास धनगर यांच्या विरोधात भादंवि कलम ४०७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला़
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षक नाना आखाडे यांच्याकडे सोपविण्यात आला़ त्यांनी तपासाची चक्रे फिरविली आणि ट्रकसह चालक आणि सहचालक या दोघांसह तीन असे एकूण पाच जणांना संशयावरुन ताब्यात घेतले आहे़ त्यांची चौकशी सुरु आहे़
दरम्यान, ट्रक आणि काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे़ त्यांची चौकशी सुरु असून लवकरच अधिक माहिती देण्यात येईल़ अशी माहिती धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़