‘अनलॉक’चा पहिल्याच टप्पा हाऊसफुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 10:07 PM2020-06-05T22:07:31+5:302020-06-05T22:07:48+5:30

लॉकडाऊननंतरची स्थिती : वस्तुंच्या खरेदीसाठी उसळली गर्दी, पश्चिम आणि उत्तर दिशेतील दुकाने शनिवारी राहणार उघडी

The first stage of 'Unlock' is housefull | ‘अनलॉक’चा पहिल्याच टप्पा हाऊसफुल्ल

‘अनलॉक’चा पहिल्याच टप्पा हाऊसफुल्ल

Next

धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता़ त्यानंतर ‘अनलॉक’च्या पहिल्या टप्प्यात शिथीलता दिल्याने, बाजारपेठेतील काही दुकाने सुरु झाली. त्यामुळे तब्बल दोन महिन्यानंतर बाजारपेठ गजबजली असल्याचे दिसून आले़
कोरेनाच्या पार्श्वभूमिवर गेल्या २३ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन आहे. सर्व व्यवहार ठप्प होते. त्यामुळे नेहमी गजबजणारा आग्रा रोड तसा शांतच होता़ नियमित होणारी उलाढाल ठप्प झाल्याने व्यापाऱ्यांना लाखोंचा फटका बसलेला आहे़ दुकाने सुरु करण्याबाबत गेल्या १५ दिवसांपासून व्यापारी महासंघाच्यावतीने प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु करण्यात आला होता़ त्यासाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी संजय यादव, पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत आणि आयुक्त अजीज शेख यांच्या समवेत बैठका घेण्यात आल्या होत्या़ वेळोवेळी चर्चेनंतर दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शहरातील आग्रा रोडवरील दुकानांसह बाजारपेठेतील दुकानांसाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे़ त्यासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंतची वेळ देण्यात आली़ त्यात दोन भागांचे निर्बंध लावण्यात आले आहेत़ पूर्व व दक्षिण दिशेला प्रवेशद्वार असणारी दुकाने विषम तारखेला (१, ३, ५़ ७़ ९) व पश्चिम व उत्तर दिशेला मुख्य प्रवेशद्वार असणारी दुकाने सम तारखेला (२, ४, ६, ८, १०) उघडे राहणार आहेत़ नियमानुसार शुक्रवारी आग्रारोडवरील पूर्व व दक्षिणेकडील प्रवेशद्वार असलेली दुकाने सुरु करण्यात आली़ त्यामुळे काही अंशी का असेना बाजारपेठ गजबजली असल्याचे दिसून आले़ सायंकाळी उशिरापर्यंत गर्दी कायम होती़
आयुक्तांनी केली पाहणी
अनलॉकचा पहिला टप्पा सुरु झाल्यानंतर आग्रा रोडवर गर्दी उसळली होती़ गर्दी होत असल्याची माहिती आयुक्त अजीज शेख यांना मिळताच त्यांनी अभियंता कैलास शिंदे यांना सोबत घेऊन संपूर्ण आग्रा रोडची पाहणी केली़ यावेळी ज्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग आढळून आले नाही त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या़ नागरीकांनी जेथे गर्दी केली होती ती देखील कमी करण्यात आली़ आग्रा रोडवर या अधिकाऱ्यांनी वाहनातून पाहणी न करता पायी जावूनच तपासणी केली़

Web Title: The first stage of 'Unlock' is housefull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे