बोराडीत आढळला कोरोनाचा पहिला रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 22:19 IST2020-06-13T22:18:48+5:302020-06-13T22:19:13+5:30
सहा दिवसाचा लॉकडाऊन : पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांना कोविड सेंटरमध्ये पाठविले

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर/बोराडी : शहरात आता कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत जात असून शुक्रवार दुपारपर्यंत तब्बल ९० कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. गुरूवारी रात्री उशिरा देखील ३ रुग्ण आढळले असून त्यात शहरात २ तर एक बोराडीला आढळून आला आहे़ बोराडी पाच दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे.
बोराडीत पाच दिवस फक्त मेडिकल दवाखाने व अत्यावश्यक सुविधा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे. जे दुकानदार सुरू ठेवतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना बाहेर किंवा बाहेरील लोकांना कंटेन्मेंट झोन प्रवेश देऊ नये. कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना बाहेर येता येणार नाही. त्यासाठी ग्रामपंचायतीने त्यांचे एक ते दोन कर्मचारी नेमून दिले आहे. ते नागरिकांना वस्तू आणण्यासाठी मदत करतील. कुठलाही प्रकारचा कामचुकारपणा केल्यास पहिला गुन्हा ग्रामविकास अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात येईल अशी तंबी दिली.
बोराडी येथे गुरुरवारी रात्री ११.३० वाजेला २४ वर्षीय युवक व त्याच्या संपकार्तील इतर ५ लोकांना शिंगावे क्वारंटाईन सेंटर येथे पाठविण्यात आले. उपसरपंच राहुल रंधे यांनी रात्रीपासून ग्रामपंचायतीमार्फत गावातील वस्त्यांमध्ये सॅनीटायझर फवारणी व धुरळणी केली. पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला. त्या गल्लीतील नागरिकांना मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
शुक्रवारी तहसीलदार आबा महाजन तालुका वैद्यकीय अधिकारी प्रसन्न कुलकर्णी गटविकास अधिकारी रेदा पावरा, सांगवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे, बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी नीलिमा देशमुख यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या गल्लीतील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आल्यात.