अनोळखी महिलेच्या मृत्यूप्रकरणी सात महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:40 IST2021-08-28T04:40:22+5:302021-08-28T04:40:22+5:30
शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा गावाच्या शिवारातील तापी नदीच्या पात्रात २ जानेवारी २०२१ रोजी दुपारी सव्वा बारा वाजेपूर्वी एका ३५ ते ...

अनोळखी महिलेच्या मृत्यूप्रकरणी सात महिन्यांनंतर खुनाचा गुन्हा दाखल
शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा गावाच्या शिवारातील तापी नदीच्या पात्रात २ जानेवारी २०२१ रोजी दुपारी सव्वा बारा वाजेपूर्वी एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. याप्रकरणी दोंडाईचा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या महिलेला गळफास देऊन पाण्यात फेकले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्या अनुषंगाने तिचे शवविच्छेदन दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या शवविच्छेदनात मृत महिलेचा व्हिसेरा अधिक तपासणीसाठी नाशिक येथील न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर महिलेचा कोणीतरी खून केल्याचे निष्पन्न झाले. मृत महिलेला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने कशाच्या तरी साहाय्याने तिचा गळा आवळून ठार मारले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह टाकरखेडा शिवारातील तापी नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे उघडकीस आले आहे.
त्यानुसार २५ ऑगस्ट रोजी या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिनेश मोरे यांनी दोंडाईचा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३०२, २०१ अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास दोंडाईचा पोलीस करीत आहेत.