लग्न, अंत्ययात्रेत गर्दी केल्यास गुन्हे दाखल करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 23:09 IST2020-06-21T23:09:31+5:302020-06-21T23:09:50+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश : संसर्ग रोखण्यासाठी कठोर पाऊल

लग्न, अंत्ययात्रेत गर्दी केल्यास गुन्हे दाखल करा
धुळे/शिरपूर : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर विवाह आणि अंत्यसंस्कारासाठी गर्दी वाढत आहे. त्यातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समारंभावर लक्ष्य ठेवण्यासाठी पोलिस पाटील, तलाठी आणि ग्रामसेवक यांची संयुक्त समिती गठित करण्यात यावी. नियमांपेक्षा अधिक गर्दी असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. त्यासाठी ग्रामसेवकांनी फिर्याद द्यावी असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत़
शिरपूर तालुक्यासह जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ मृतांचा आकडाही वाढू लागला आहे़ संसर्गाचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तपासणीची व्यापक मोहिम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत़
जिल्हाधिकाºयांनी शनिवारी शिरपूर येथे भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेश पटेल, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागूल, पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, माजी मंत्री अमरिशभाई पटेल आदी उपस्थित होते.
शिरपूर तालुक्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ४५ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाची तपासणी करून संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन अहवाल प्राप्त करुन घ्यावेत़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्यांनतरही शिरपूर तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे. ही काळजीची बाब आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आता तपासणीसाठी व्यापक मोहीम राबवावी. रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक असेल अशा नागरिकांची तपासणी करण्यात यावी. यात कोणाला उपचाराची आवश्यकता भासली तर तत्काळ रुग्णालयात दाखल करुन औषधोपचार सुरू करावेत असे आदेश त्यांनी दिले़
शिरपूर येथील वाढती रुग्ण संख्या पाहता अंबिका नगरात घशातील स्रावांचे नमुने घेण्यासाठी संकलन केंद्र सुरू करावे, जनजागृतीवर भर द्यावा तसेच बोराडी येथील आयुर्वेद महाविद्यालयात कोविड केअर हेल्थ सेंटर सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या़