सासरा, गर्भवती मुलगी व जावई ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2020 22:31 IST2020-11-13T22:30:31+5:302020-11-13T22:31:13+5:30
जावई व मुलगी दिवाळीसाठी येत होते गावी, दुसरी मुलगी गंभीर जखमी

dhule
विसरवाडी/धुळे : सासरे, जावई व मुलीचा भिषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना विसरवाडीनजीक घडली. या अपघातात दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मयत महिला पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगण्यात आले. शवविच्छेदनातून ते स्पष्ट झाले. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. मृत प्रफुल्ल हा मुळचा धुळ्यातील राहणारा होता. त्यामुळे रात्री उशीरा त्याच्यावर धुळ्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
दिवाळीनिमित्त गोरख सोनू सरक (५६), प्रफुल सुरेश वाघमोडे (३५) व मनीषा प्रफुल वाघमोडे (२४ ) सर्व राहणार महिर ता. साक्री जि धुळे हे जागीच ठार तर निकिता गोरख सरक (१५) ही गंभीर जखमी झाली.
साक्री तालुक्यातील महिर येथील रहिवासी गोरख सोनू सरक यांची मुलगी व जावई हे राजकोट येथे नोकरी करतात. मुलगी व जावई हे राजकोट येथून दिवाळीनिमित्त घरी येण्यासाठी निघाले. त्यात राजकोटहून सुरतपर्यंत एका खाजगी वाहनाने आले. त्यांना घेण्यासाठी गोरख सोनू सरक व त्यांची लहान मुलगी निकिता गोरख सरक हे सुरत येथे कारने (क्रमांक एमएच -१८ डब्ल्यू २३९०) सुरत येथून त्यांना घेऊन पुन्हा सुरत येथून महिर या गावी जाण्यासाठी निघाले.
कार धुळे-सुरत महामार्गावरील कोंडाईबारी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या खामचौदर शिवारातील हजरत सय्यद अली रसूल बाबा यांच्या दर्ग्या जवळील पुलाजवळून जात असताना धुळ्याकडून सुरतकडे भरधाव जाणाऱ्या कंटेनरने (क्रमांक एमएच १८- डब्ल्यू २३९०) कारला धडक दिली. या अपघातात कार पुलावरून सरळ ४० फूट खाली कोसळली. अपघातात कारमधील गोरख सोनू सरक, प्रफुल सुरेश वाघमोडे, व मनीषा प्रफुल वाघमोडे हे जागीच ठार झाले. तर निकिता गोरख सरक ही गंभीर जखमी झाली.
हा अपघात इतका भीषण होता की अपघातग्रस्त कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. अपघातानंतर ट्रक पुढे जाऊन रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस व महामार्ग पोलिस मदत केंद्रावरील पोलीस तसेच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यांनी मयत व जखमीला विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमीवर वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद वळवी व परिचारिका वर्ग यांनी उपचार केले व पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, उप पोलीस अधीक्षक सचिन हिरे, महामार्ग पोलीस मदत केंद्राची सहायक पोलीस निरीक्षक आर.एम. काझी, विसरवाडी पोलीस ठाण्याची सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक भूषण बैसाने व पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट दिली.
अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पसार झाला. धुळे सुरत महामार्गावर वारंवार अपघात होत असून हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.
२१ ऑक्टोबर रोजी याच ठिकाणी याच पुलावरून एक खासगी लक्झरी बस कोसळून अपघात झाला होता. या अपघातात पाच जण जागीच ठार तर ३५ जण जखमी झाले होते. पुन्हा आज २२ दिवसांनी त्या ठिकाणी त्याच पुलावरून हा अपघात झालेला आहे. या अपघातास महामार्ग अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, असा संताप व्यक्त केला जात आहे.
मयत गोरख सरक यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. मयत सरक यांच्या अंत्यसंस्काराला साक्री आगारातील कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते.