शेतकऱ्यांनाच ज्वारी विकत घेऊन खावी लागणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:44+5:302021-08-13T04:40:44+5:30
धुळे : गेल्या काही वर्षांपासून नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने ज्वारीचा पेरा घटला आहे. ज्वारी पिकविणे कमी झाल्याने ...

शेतकऱ्यांनाच ज्वारी विकत घेऊन खावी लागणार!
धुळे : गेल्या काही वर्षांपासून नगदी पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याने ज्वारीचा पेरा घटला आहे. ज्वारी पिकविणे कमी झाल्याने शेतकरी कुटुंबांनादेखील ज्वारी विकत घेऊन खाण्याची वेळ येणार आहे.
पूर्वीच्या काळी ज्वारीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असे. परंतु सन २०१७ पासून पीकपेरा कमी झाला. २०१९ पर्यंत ९ हजार ते १४ हजारांपर्यंत स्थिर असलेला पीकपेरा सन २०२० मध्ये कमालीचा वाढला. आरोग्याच्या दृष्टीने ज्वारीची भाकरी पाैष्टिक असल्याने मागणी वाढली आणि पीकपेरा २० हजारांच्या पुढे गेला. परंतु ज्वारीला हमीभाव मिळाला नाही. अनेक शेतकऱ्यांची ज्वारी पडून राहिली. त्यामुळे यंदा पीकपेरा केवळ दहा हजार हेक्टरच्या आतच झाला.
शेतकऱ्यांना हेव पैशांचे पीक
पूर्वीच्या काळी पैशांना फार महत्त्व नव्हते. ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबाला वर्षभर पुरेल इतके अन्नधान्याचे पीक घेत असत. आता केवळ नगदी पिके घेतली जातात. सिंचनाच्या सोयी झाल्या आहेत. - दिनकर सोनवणे, शेतकरी
सध्या गरजा खूप वाढल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. दवाखान्यात सर्वात जास्त पैसे लागतात. अन्नधान्य विकत घेता येते. पण पैसा कुठून आणणार. त्यामुळे नगदी पीक घेतलेले सोयीचे. - योगेश पाटील, शेतकरी
का फिरवली शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ?
पूर्वीप्रमाणे आता ज्वारी नियमित खाणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. हमीभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्चदेखील निघत नाही. पैशांना फार महत्त्व आले आहे. इतरांनी ते पेरले म्हणून आपणही तसेच करावे, यासह इतरही कारणांमुळे शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवली आहे. परंतु ज्वारीच्या भाकरीचा आहार आरोग्यासाठी चांगला असतो.