शेतकऱ्याने गुरांपुढे टाकले टरबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 11:42 IST2019-11-18T11:42:11+5:302019-11-18T11:42:51+5:30
मालपुर : सततच्या पावसामुळे उत्पादनात दुपटीने घट, बाजारातील दरातही झाली मोठी घसरण

dhule
मालपुर : लाख रुपये खर्चून टरबूज पिक घेतले. मात्र, उत्पन्नात दुपटीने घट आली. साडेचार एकरातून केवळ ३० टन पिक हाती आले. त्यात परतीच्या पावसामुळे धुमाकूळ घातल्यामुळे भावातही प्रचंड घसरण झाली. यामुळे गुरांपुढे टरबूज टाकण्याची वेळ शेतकºयावर आली.
मालपूर येथील शेतकऱ्यांनी पाणीटंचाईच्या काळात पाण्याचा काटकसरीने वापर करुन कशीतरी पिके जगविली. भागभांडवल लावले. पिके देखील चांगली बहरली. मात्र, ऐनवेळी हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला. त्यात बाजारपेठेत टरबूजच्या भावात प्रचंड घसरण झाल्यामुळे नैराश्याचे वातावरण आहे.
येथील शेतकरी उत्तम चिंतामण तावडे यांनी साडेचार एकर क्षेत्रात फळबाग पिक म्हणून टरबूजाची लागवड केली. मात्र, खूप मोठा तोटा सहन करावा लागला. २० जुलैनंतरच्या सततच्या पावसामुळे पुरेशी फळधारणा झालीच नाही. दरवर्षी याच क्षेत्रातून ८० टनापेक्षा जास्त टरबूज उत्पादन निघत होते. तेथे ३० टनाच्या आतच उत्पादन हाती आले. तेही दर्जा खालावलेले आहे.
लाखाच्या वर भागभांडवल, बी-बियाणे, किटकनाशकांचा खर्च झालेला आहे. दोन हजार रुपये दराचे २१ पाकिटे टरबूज बियाण्यांची त्यांनी साडेचार एकरावर लागवड केली. ४२ हजार रुपयांचे मलचिंग पेवरचे १५ बंडल या क्षेत्रफळावर अंथरले. २७ हजार रुपये खर्चून सुक्ष्म अन्नद्रव्य म्हणून बेसेल डोस, मजुरी, फवारणी केली. मात्र, पावसाने खूप मोठे नुकसान केले. यामुळे उत्पन्नात देखील घट आली.
अगोदरच उत्पन्नात घट आली असताना बाजारात भावात प्रचंड घसरण झाली. तसेच मागणी नसल्यामुळे रुपया किलो दराने सुद्धा कोणी खरेदी करीत नसल्यामुळे व्यापाºयांनी पाठ फिरविली. तयार झालेले हे पिक जास्त दिवस ठेवणे धोक्याचे ठरते म्हणून येथील टरबूज गुरांना टाकावी लागल्याचे शेतकºयाने सांगितले.
मागील वर्षी टरबूजाला १६ ते १७ रुपये किलो जागेवरच शेतात भाव दिला जात होता. मागणी देखील मोठ्या प्रमाणावर होती. व्यापारी शेतशिवारात फिरतांना दिसून येत होते. मात्र, यावर्षी निसर्गाने घात केल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
कांदा उत्पादनातही घट
कांदा उत्पन्नात प्रचंड घट झाली असून जास्त पाण्यामुळे कांदे सडून गेले आहेत. तीन एकर क्षेत्रातून फक्त २९ कट्टे कांदे उत्पादन मिळाले आहे. शेतकºयांना खाजगी सावकारांकडून पैसे घेऊन मजुरी चुकवावी लागत आहे.