रब्बीच्या सिंचनाकरिता शेतकऱ्यांची रात्रपाळी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:44 IST2021-02-05T08:44:26+5:302021-02-05T08:44:26+5:30
बळसाणे : शेतकऱ्यांला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, मात्र त्यांच्या जीवावर राजकीय खुर्ची उबविणारे मात्र त्याच्याकङे नेहमी दुर्लक्ष करीत असतात. ...

रब्बीच्या सिंचनाकरिता शेतकऱ्यांची रात्रपाळी कायम
बळसाणे : शेतकऱ्यांला जगाचा पोशिंदा म्हटले जाते, मात्र त्यांच्या जीवावर राजकीय खुर्ची उबविणारे मात्र त्याच्याकङे नेहमी दुर्लक्ष करीत असतात. दिमतीला लाखोंची जमीन असली तरी ती सिंचित करून पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना शेतात रात्रभर राबवावे लागते. शिवारात अनोळखी इसमांकडून दगा फटका , प्राण्यांचा हल्ला तसेच विषारी प्राण्यांच्या दंशाची भीती देखील शेतकऱ्यांना सतावते.
काही वर्षापूर्वी बळसाणेसह माळमाथ्था परिसरात शेतात राबतांना सर्पदशांने शेतकऱ्यास जीव ही गमवावा लागला आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत माळमाथा भागात अशा घटना घडल्या नसल्या, तरी केव्हा कुठली अनाहुत घटना पुढे येईल याची शाश्वती सांगता येणार नाही. शेतकऱ्यांना २४ तास व दिवसा वीजपुरवठा करण्याच्या राज्यकर्त्यांच्या घोषणा व घोषणाच राहिल्या आहेत.
रात्रपाळीला शेतकऱ्यांना वावरात सरपटणारे प्राणी व हिंस्र प्राण्यांचा लागलेला डर यामुळे दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी बळसाणे , दुसाणे , इंदवे , हाट्टी खुर्द , ऐचाळे , लोणखेडी , कढरे , सतमाने , अमोदा छावडी , अगरपाडा , घानेगाव , नागपूर वर्धाने आदी माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
सध्या बळसाणे शेतशिवारात महावितरणकडून शेतीला सकाळची साडेआठ ते दुपारी साडेचार वाजेपर्यंत वीजपुरवठा होतो. आणि रात्री सव्वादहा ते सकाळी सव्वाआठ वाजेपर्यंत असे चार - चार दिवस रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त शेतीला वीज मिळत नसल्याची खंत नवल इंदा पाटील यांनी केली.
आठवड्याचे काही दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी आपला जीव धोक्यात घालावा लागत आहे. यामुळे शेतीला कायम दिवसागणिक वीजपुरवठा सुरु करण्याची मागणी बळसाणे गावासह माळमाथा भागातील शेतकऱ्यांकडून होत आहे.
गेल्यावर्षी माळमाथा भागात चांगला पाऊस झाला. त्यामुळे छोटे मोठे प्रकल्प व बंधाऱ्यात पाणी उपलब्ध आहे. शिवाय विहीर , बोअर हे देखील भरले आहेत. त्यात रब्बी हंगाम ही बहरला असून काही शेतकऱ्यांना ढगाळ वातावरणामुळे फटाका ही बसला आहे. शेतातील पीक जगविण्यासाठी शेतकरी रात्री बेरात्री शेतात पाणी देण्यासाठी जात आहे.
रात्री उशिरा वीज येत असेल त्यावेळी सोबत बँटरी , काठी घेऊन जावे लागते. त्यात खराब शेतरस्त्यांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची वाट ही बिकट झाली आहे. त्यात तांत्रिक अडचण आली आणि वीज गुल झाल्यावर शेतकऱ्यास रात्रीचा मुक्काम शेतातच ठोकावा लागत असल्याचे सांगण्यात आले.
रात्री बेरात्री पिकांना पाणी देतांना हिंस्त्र प्राणी , सापांसह सरपटणारे प्राण्यांचा हल्ला होण्याचे प्रकार ही यापूर्वी घडले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या कारणाने रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांचा जीवावर उठत आहे. अशा कुठल्याही प्रकारचा दुर्दैवी घटना होऊ नये म्हणून दिवसा वीजपुरवठा करावा अशी चर्चा आपसात शेतकरी वर्गातून होत आहे.
प्रतिक्रिया
रात्रीच्या वेळी शेतातील पिकांना पाणी देणे म्हणजे जीव धोक्यात घालण्याचा प्रकार झाला आहे. जंगल म्हटल्यावर हिंस्र प्राण्यांच्या व सापासह सरपटणारे प्राण्यांची भीती लागते. त्यात रात्रीची वीज बंद झाल्यावर अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
किशोर शंकर हालोरे ( शेतकरी , बळसाणे )
प्रतिक्रिया नंबर , २
महाराष्ट्र वीज नियामक आयोगानुसार व वरिष्ठ स्तरावरुन शेतीसाठी वीजपुरवठाबाबत आलेल्या शेड्यूलनुसार सध्या शेतीला वीजपुरवठा केला जातो. शेतीला दिवस आणि रात्री अशा दोन्ही वेळांमध्ये वीजपुरवठा होत आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये याकडेही लक्ष दिले जाते आहे.
आर. बी. जोशी
कार्यकारी अभियंता , दोंडाईचा