शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम
By अतुल जोशी | Updated: March 31, 2023 15:48 IST2023-03-31T15:46:51+5:302023-03-31T15:48:08+5:30
केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली.

शेततळे योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, जिल्ह्यात १०१ पैकी केवळ ४ जणांनी सुरू केले काम
धुळे: कोरडवाहू क्षेत्रातील शेती ही पूर्णत: पावसावरच अवलंबून असते. मात्र काही वर्षात पावसाचे प्रमाण कमी व अनिश्चित झाल्याने, त्याचा परिणाम कृषी उत्पन्नावर होऊ लागला आहे. पिकांचे नुकसान होऊ नये, सिंचन क्षमता वाढावी यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेंतर्गत वैय्यक्तिक शेततळे योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात या योजनेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. जिल्ह्यात २०२२-२३ या वर्षासाठी लॅाटरी पद्धतीने १०१ जणांची निवड करण्यात आली. मात्र केवळ चार शेतकऱ्यांनीच शेततळ्याला सुरूवात केल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातून देण्यात आली.
शासनाच्या कृषी विभागाकडून सिंचनासाठी मागेल त्याला शेततळे ही याेजना सन २०१६ पासून सुरूकरण्यात आली. २०१६-१७ या वर्षासाठी जिल्ह्याला ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यात धुळे तालुका १००, साक्री तालुका २५० व शिरपूर व शिंदखेडा तालुक्याला ७५-७५ शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ४६३ शेततळ्यांना मंजुरी देण्यात आली. मात्र केवळ १५० शेतकऱ्यांनीच शेततळे पूर्ण केले. त्यानंतर ही योजना गुंडाळण्यात आलीहोती. आता शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन याेजनेचा विस्तार करून वैयक्तीक शेतकऱ्यांचा यंदापासून या याेजनेत समावेश केला. र जिल्ह्यातही या याेजनेची अंमलबजात्तणी सुरू झाली. २०२२-२३ या वर्षासाठी जिल्ह्याला २६० शेततळ्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार ॲानलाइन १०३ अर्ज प्राप्त झाले हाेते. त्यातील दहा जणांना पूर्व संमीती दिलेली आहे. . मात्र प्रत्यक्षात केवळ चारच ठिकाणी कामांना सुरूवात झाली आहे.
त्यात धुळे तालुक्यात एक व साक्री तालुक्यातील तीन शेततळ्याचे काम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेततळे याेजनेला शेतकऱ्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांनी याेजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"