सुनील बैसाणे
धुळे : पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने खासगी प्रवासी वाहनचालक व मालकांनीदेखील भाडेवाढ केली आहे. वेगवेगळ्या वाहनांचे प्रवास दर प्रतिकिलोमीटर एक ते दोन रुपयांनी वाढवले आहेत. त्यामुळे गाडी करून फिरायला जाण्याचा प्रवासही महागला आहे.
इनोव्हा कारचे भाडे प्रतिकिलोमीटर १२ रुपयांवरून १४ रुपये झाले आहे, तर स्विफ्ट डिझायर ९ वरून १० रुपये, स्काॅर्पिओ आणि क्रुझर ११ रुपयांवरून १२ रुपये भाडेवाढ करण्यात आली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर गगनाला भिडल्याने खासगी प्रवासी वाहनचालकांना जुने भाडे परवडणारे नाही. कोरोनामुळे आधीच नुकसान सोसल्याने त्यांनी भाडेवाढ केली आहे.
असे वाढले पेट्रोल-डिझेलचे दर (प्रतिलिटर)
वर्ष पेट्रोल डिझेल
ऑगस्ट २०१८ ८३ ७२
ऑगस्ट २०१९ ७८ ७०
ऑगस्ट २०२० ८७ ८०
ऑगस्ट २०२१ १०७ ९७
प्रवासी वाहनांचे दर
वाहनाचा प्रकार दर
इनोव्हा १४ रु.
स्विफ्ट १० रु.
स्काॅर्पिओ १२ रु.
क्रुझर १२ रु. (प्रतिकिलोमीटर)
गाडीचा हप्ता कसा भरणार?
कोरोनाचा संसर्ग, लाॅकडाऊन, जनता कर्फ्यू, कठोर निर्बंध या कारणांमुळे खासगी प्रवासी वाहनचालक-मालकांचे नुकसान झाले आहे. वाहनांची चाके थांबली होती. निर्बंध शिथिल झाले. परंतु पेट्रोल आणि डिझेलचे दर कमालीचे वाढले आहेत. जुन्या भाडे परवडणारे नाही. त्यामुळे भाडेवाढ केली आहे.
- दत्तू चाैधरी, वाहनमालक
खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन गाडी घेतली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. भाडेवाढ केली नाही तर आम्हाला परवडणार नाही. कमी भाड्यात गाडीचे हप्ते भरायचे की घर चालवायचे, असा प्रश्न आहे. त्यामुळे भाडेवाढ करावी लागली आहे. -वाहनचालक