पोलीस नियंत्रण कक्षालाही फेक कॉल; सर्वाधिक कॉल भांडण अन् मारामारीचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:40 IST2021-08-13T04:40:58+5:302021-08-13T04:40:58+5:30
धुळे : फेक कॉलचे प्रमाण सर्वदूर असताना त्यात पोलीस नियंत्रण कक्षाचाही समावेश होण्यास सुरुवात झाली आहे. या कक्षात फेक ...

पोलीस नियंत्रण कक्षालाही फेक कॉल; सर्वाधिक कॉल भांडण अन् मारामारीचे
धुळे : फेक कॉलचे प्रमाण सर्वदूर असताना त्यात पोलीस नियंत्रण कक्षाचाही समावेश होण्यास सुरुवात झाली आहे. या कक्षात फेक कॉलव्यतिरिक्त चुकीचा नंबर लागत असल्याने त्याचाही त्रास पोलीस कर्मचाऱ्यांना नाहक सहन करण्याची वेळ आली आहे. एखाद्या चौकात वाहतूक कोंडी झाली आहे, तातडीने पोलीस बोलावून कोंडी सोडवा, असेही फोन येण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. त्यातल्या त्यात भांडण आणि मारामारी सुरू असल्याचे कॉलदेखील पोलिसांना येत असतात. आलेल्या कॉलची लागलीच शहानिशा देखील केली जात असते.
सर्वाधिक कॉल राँग नंबरचेच
कोणालाही पोलिसांची मदत हवी असल्यास त्यासाठी पोलिसांचा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू असतो. यासाठी मदत मागणाऱ्यांकडून फोन येत असतात. त्यात राँग नंबरचे कॉल सर्वाधिक आहे. ही समस्या वेळीच सुटली तर कॉल येण्याचे प्रमाण खूपच कमी होणार आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दररोज किमान ८ ते १० फेक कॉल
- पोलीस नियंत्रण कक्ष हा सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि पोलिसांशी संपर्क असावा यासाठी त्याची रचना केलेली आहे; पण फेक कॉलमुळे सर्वांचीच डोकेदुखी ठरू पाहत आहे.
- नियंत्रण कक्षात साधारणपणे दररोज ८ ते १० कॉल हे निव्वळ फेक कॉलमध्ये समाविष्ट होतात. आलेल्या कॉलनुसार अंमलबजावणी केल्यानंतर आलेला फोन हा खोटा असल्याचे समोर येते.
- शहरातील पाचकंदील परिसरासह वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी झालेली आहे, पोलिसांना बोलवा, असेही फोन येतात. त्यावेळेस नागरिकांकडून आपले नावदेखील सांगितले जात नाही.
- काही वेळेस नागरिकांकडून रात्रीदेखील फोन केले जातात. त्याचा निष्कर्ष तपासल्यास काहीही निघत नाही. त्यामुळे येणारा प्रत्येक काॅल हा कुठून आला आणि कोणी केला याची माहिती पोलिसांकडे असायला हवी.
- नियंत्रण कक्षात राँग नंबर येण्याचे प्रमाण अधिक असल्याने हा प्रश्न संबंधित यंत्रणेने तातडीने सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याची आवश्यकता आहे. जेणेकरून पोलिसांचा ताण कमी होऊ शकेल.
पोलीस नियंत्रण कक्ष हा पोलिसांसोबतच सर्वसामान्य नागरिकांसाठी देखील आहे. हे नागरिकांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. खरोखरच आपल्याला पोलिसांची गरज लागणार असेल तर मदत मागावी. पोलीस तत्पर आहेत; पण चुकीचे व फेक कॉल कोणी करत असेल तर त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल.
- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक
कंट्रोल रूमला आलेले कॉल
जून : २५०
जुलै : २६०
ऑगस्ट : १२५