सोशल मीडियावर बनावट अकाऊंट; ४५ तक्रारी, युजरने स्वत: रिपोर्ट केल्यास होते त्वरित कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:24 IST2021-07-04T04:24:43+5:302021-07-04T04:24:43+5:30
धुळे : सोशल मीडियावर फेक अकाऊंट संदर्भात तक्रार दाखल झाल्याने त्वरित कारवाई केली जाते, अशी माहिती धुळे जिल्हा पोलीस ...

सोशल मीडियावर बनावट अकाऊंट; ४५ तक्रारी, युजरने स्वत: रिपोर्ट केल्यास होते त्वरित कारवाई
धुळे : सोशल मीडियावर फेक अकाऊंट संदर्भात तक्रार दाखल झाल्याने त्वरित कारवाई केली जाते, अशी माहिती धुळे जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेलचे पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांनी दिली.
धुळे जिल्हा पोलीस दलात वर्षभरापासून स्वतंत्र सायबर सेल सुरू झाला आहे. तत्पूर्वी त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल होत असत. वर्षभरात सोशल मीडियावरील अकाऊंट हॅक संदर्भात ४५ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी ३० तक्रारींवर कारवाई पूर्ण झाली आहे तर उर्वरीत १५ तक्रारींच्या संदर्भात चाैकशी सुरू आहे. यात फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करणे, व्हाॅट्सॲपचे अकाऊंट हॅक करणे या तक्रारींचा समावेश आहे. तसेच सायबर क्राईमशी संबंधित २३९ तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी १३४ तक्रारींवर कारवाई झाली आहे. इतर तक्रारींची चाैकशी सुरू आहे.
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करून भावनिक साद घालत पैसे उकळण्याचे प्रकार घडतात. फ्रेंड लिस्टमधील सदस्य पैसे पाठवतात. त्यामुळे नुकसान होते. युजर्सनी सतर्क राहिले पाहिजे.
सात दिवसांनंतर होते खाते बंद
तक्रार केल्यानंतर सात दिवसात खाते बंद होते असा आजवरचा अनुभव आहे.
सायबर सेलकडे तक्रार आल्यावर पोलीस नोटीस पाठवतात. नोडल अधिकारींशी संपर्क करतात. परंतु त्यानंतर खाते बंद करण्याचा कालावधी निश्चित नाही.
परंतु युजरने स्वत: आपल्या अकाऊंटवरून तक्रार केली तर चोवीस तासांच्या आत बनावट खाते बंद केले जाते.
तुम्हाला बनावट
अकाऊंट दिसले तर...
आपल्या नावाने बनावट अकाऊंट दिसले तर सर्वप्रथम अकाऊंट फेक आहे की हॅक झाले आहे याची खात्री करावी. घाबरुन न जाता त्वरित सायबर सेलची संपर्क साधावा.
फेक अकाऊंट युजर स्वत: बंद करू शकतात. युजरने स्वत: रिपोर्ट केले तर चोवीस तासांच्या आत अकाऊंट बंद होते. रिपोर्ट करण्याची प्रोसेस समजून घ्यावी.
फेक अकाऊंटची प्रोफाईल युआरएल लिंक काॅपी करून आपल्या अकाऊंटवरून तक्रार दाखल करावी. त्वरीत कारवाई होत आणि अकाऊंट बंद केले जाते.
ही प्रोसेस कंपनीच्या वेबसाईवर समजून घेता येऊ शकते. किंवा सायबर सेलशी संपर्क साधल्यास त्यांच्याकडूनही सविस्तर माहिती मिळू शकते.
धुळे सायबर सेलचा युट्यूबवर व्हीडीओ
सोशल मीडियावरील फेक अकाऊंट कसे बंद करावे याविषयी सविस्तर माहिती असलेला व्हिडिओ धुळ्याच्या सायबर सेलने तयार केला आहे.
पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस काॅन्स्टेबल दिलीप वसावे यांनी हा व्हिडिओ केला आहे.
‘हाऊ टू रिपोर्ट फेक फेसबुक ॲण्ड इन्स्टाग्राम अकाऊंट’ असे सर्च केले तरी हा व्हीडीओ पाहता येवू शकतो.
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युजर्सनी हा व्हीडीओ पाहून फेक अकाऊंट बंद करण्याची प्रोसेस समजून घ्यावी. तसेच मित्रांनाही व्हीडीओची लिंक पाठवून समजावून सांगावे. घाबरुन न जाता तक्रार दाखल करावी, असे आवाहन पीआय सतीश गोराडे, वसावेंनी केले.
कोरोना काळामध्ये वाढल्या तक्रारी
कोरोना आणि लाॅकडाऊनच्या काळात सायबर क्राईमचे गुन्हे वाढले आहे.
वर्षभरात तब्बल २८४ वेगवेगळे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे सायबर सेल अलर्ट झाला आहे.
सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युजर्सने देखील सतर्क रहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.