अपहारप्रकरणी चिमठाणेचे तत्कालीनसह विद्यमान ग्रामसेवक निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 22:45 IST2021-02-17T22:45:44+5:302021-02-17T22:45:52+5:30
चिमठाणे ग्रामपंचायतीत २०१७ ते २०२० या कालावधीत मोठा अपहार झाला होता

अपहारप्रकरणी चिमठाणेचे तत्कालीनसह विद्यमान ग्रामसेवक निलंबित
धुळे- शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे ग्रामपंचायतीत २०१७ ते २०२० या कालावधीत मोठा अपहार झाला होता. या संदर्भात विभागीय चौकशी झाल्यानंतर तत्कालीन व विद्यमान ग्रामसेवकांना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिले आहेत. चिमठाणे ग्रामपंचायतीत अपहार झाल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली होती. त्यानुसार विभागीय चौकशी झाली. चौकशीत ग्रामनिधी व १४व्या वित्त आयोगाच्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. तसेच निधीच्या रकमेत अपहार झाल्याचे समोर आले.त्यामुळे विभागीय आयुक्तांनी तत्कालीन ग्रामसेवक हंसराज पाटील विद्यमान ग्रामसेवक संतोष भामरे यांच्यासह विद्यमान सरपंचावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दोन्ही ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले. यात सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य दोषी आढळल्यास त्यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. गटविकास अधिकारी अपहाराची रक्कम निश्चित करून ती वसूल करतील, अशी माहिती ग्रामपंचायत विभागातून देण्यात आली. यासंदर्भात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.जे. तडवी व शिंदखेड्याचे गटविकास अधिकारी संजय सोनवणे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.