वर्षभराचा रोड टॅक्स माफ करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 21:14 IST2020-06-08T21:14:32+5:302020-06-08T21:14:50+5:30
खाजगी बस असोसिएशन : प्रशासनाला दिले निवेदन

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : लॉकडाउनमुळे खाजगी बस, ट्रॅव्हल्स मालकांचे नुकसान झाले असून एक वर्षाचा रोड टॅक्स माफ करावा अशी मागणी धुळे व नंदुरबार जिल्हा तसेच मालेगाव तालुका खाजगी बस, ट्रॅव्हल्स असोसिएशनने केली आहे़
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले़ निवेदनाच्या प्रती खासदार सुभाष भामरे, आमदार फारुख शहा आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना देखील देण्यात आल्या आहेत़
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या संसर्गामुळे १४ मार्चपासून प्रवासी बस वाहतूक बंद आहे़ ट्रॅव्हल्स मालकांसह त्यांच्यावर अवलंबून असणारे व्यवसाय देखील ठप्प आहेत़ वाहन चालक, वाहक, कार्यालयीन कर्मचारी यांना देखील आर्थिक फटका बसला आहे़ सलग तीन महिने रोजगार बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे़ मालकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे़ तसेच पुढील सहा महिने व्यवसाय पूर्वपदावर येण्याची चिन्हे नाहीत़
खाजगी प्रवासी बस मालक सर्वाधिक कर भरतात़ त्यामुळे किमान एक वर्षाचा रोड टॅक्स माफ करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़ या प्रमुख मागणीसह बसेसचा विम्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवावी, मदतीचे आर्थिक पॅकेज जाहीर करावे, बँकांच्या कर्जावरील सहा महिन्याचे व्याज माफ करावे, कार्यालयीन कर्मचारी, बस चालक, वाहक यांनाही आर्थिक मदत द्यावी, इंधनावरील अतिरिक्त भार रद्द करावा, खाजगी बसेसला एक वर्षासाठी टोलमाफी द्यावी, वर्षभराचा जीएसटी कर माफ करावा, बस कर्मचाºयांना कोरोना योध्दे घोषीत करुन ५० लाखांचे विमा संरक्षण द्यावे, फिजीकल डिस्टन्सिंगमुहे केवळ पन्नास टक्के प्रवासी बसवावे लागतील़ त्यामुळे पुढील काळात रोड टॅक्स देखील पन्नास टक्के आकारावा़