साक्री तालुक्यातील टिटाणे परिसरात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 21:46 IST2020-07-03T21:46:03+5:302020-07-03T21:46:25+5:30
नुकसानीचा अंदाज : जिल्ह्यात सर्वदूर पावसाची हजेरी

साक्री तालुक्यातील टिटाणे परिसरात अतिवृष्टी
निजामपूर : साक्री तालुक्यात माळमाथ्यावर टिटाणे परिसरात मुसळधार पाऊस झाला़ गाव परिसरासह शेती जलमय झाली़ रस्त्यावरुन नदीप्रमाणे पुराचे पाणी वाहत होते़ पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त होते आहे.
निजामपूरकडून येणारी व खोरीकडून येणारी वाहने दोन्ही बाजूस खोळंबून उभी होती़ बाहेर गावाहून येणारा एक मोटर सायकलस्वार नदी प्रमाणे वेगात वाहणाऱ्या पाण्यातून जेमतेम गावात आला. त्याचे पाहून पाठीमागून येणारा दुसरा मोटर सायकल स्वार प्रवाहात गाडीसह वाहू लागला. लोकांनी हातातून गाडी सोडण्याची हाकाटी केली पण त्याने ती सोडली नाही. तरुणांनी पाण्यात जाऊन त्याला वाचविले. शुक्रवारी सायंकाळी साडे चार वाजे पासून मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावत चांगलेच झोडपून काढले़ तब्बल अडीच तास पावसाचा जोर कायम होता. भिकन बागुल यांनी झालेली विदारक स्थिती पाहून अतिवृष्टी झाल्याचे म्हटले आहे. शेतांमध्ये मोठे तलाव साचले आहेत. शेतांमधून नदी प्रमाणे प्रवाह वाहत असून रस्त्याचे दोन्ही बाजूस वाहनांची कोंडी झाली होती़
शेतात पेरलेली ज्वारी, बाजरी, कपाशी, मका, पिके पूर्णपणे पाण्यात बुडाली आहेत. सरपंच सबकदर पिंजारी, प्रवीण बागुल, भिकन बागुल, चुनीलाल बागुल, खुर्शीद पिंजारी यांनी या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी पिंपळनेर तहसीलदार, तलाठी, कृषी सहाय्यक यांना कळविले आहे. शनिवारी सकाळी किती व काय काय नुकसान झाले आहे ते स्पष्ट होईल असे सांगण्यात आले़
सोनगीरलाही पाऊस
धुळे तालुक्यातील सोनगीर आणि परिसरात पावसाने सायंकाळी हजेरी लावली़ तासभर पाऊस सुरु होता़
नेर परिसरात मुसळधार
धुळे तालुक्यातील नेर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली़ सर्वदूर पाऊस झाला़
वडजाईतही पाऊस
धुळे तालुक्यातील वडजाई आणि परिसरात पावसाने हजेरी लावली होती़ शेती कामाला सुरुवात होणार असल्याने बळीराजा आनंदीत आहे़
धुळ्यातही पावसाची हजेरी, वीज पुरवठा खंडीत
धुळे शहरात दुपारी कडकडीत ऊन पडले होते़ पाऊस येईल असे काही चिन्हे नसताना अचानक ढग भरुन आले आणि पावसाला सुरुवात झाली़ तासाभराच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता़ अनेकांची धावपळ उडाली़ काही ठिकाणी विजेचा पुरवठा खंडीत झाला़