शहरात सर्वत्र सामसुम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:48 IST2020-03-23T12:48:30+5:302020-03-23T12:48:56+5:30
शिरपूर : नागरिकांनी घरीच थांबणे पसंत केले, बाजारपेठेतही होता शुकशुकाट

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यााठी प्रशासनाकडून गर्दीच्या ठिकाणांवर निर्बंध घालण्यात आले असतांना रविवारी जनतेने स्वयंस्फुर्त कर्फ्यू लावून घेतल्यामुळे रविवार सुटीचा दिवस असूनही सुनेसुने वाटले़ शिरपूरच्या इतिहासात प्रथमच १०० टक्के कडकडीत बंद होते़ सर्वच व्यावसायिक दुकाने, हॉटेल्स, चित्रपट गृहे, प्रवाशी नसल्यामुळे बससेवा बंद असल्यामुळे शिरपूरकरांनी रविवारी घरी राहणेच पसंत केले़ जीवनाश्यक वस्तु, किराणा दुकाने, मेडिकल आदींनी देखील बंद पाळला़
शाळांना सुट्टया देण्यात आल्या असल्यातरी मुलांच्या गर्दीच्या ठिकाणी घेवून जावू नये, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्याने पालकांनीही मुलांना बाहेर आणणे टाळले़ बंदच्या आदेशामुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला तर दैनंदिन आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाल्याचे दिसून आले़ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला शिरपूरकरांनी १०० टक्के साथ दिली़ रविवारी जनतेने स्वयंस्फुर्त कर्फ्यू लावून घेतल्यामुळे रविवार सुटीचा दिवस असूनही शुकशुकाट वाटला़
२२ रोजी सकाळी प्रांताधिकारी डॉ़विक्रम बांदल यांनी शहराचा फेरफटका मारून शहरवासियांनी उत्स्फुर्तपणे जनता कर्फ्यूला साथ दिल्यामुळे समाधान व्यक्त केले़ डीवायएसपी अनिल माने व पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त चौक होता़ तहसिलदार आबा महाजन, नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी शहरात फिरून या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी फवारणी होत असलेल्या भागाची पहाणी केली़
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंध कायद्यानुसार सुरू असलेल्या उपाय योजनेनुसार आरोग्य विभागाने गर्दी होणार नाही यावर लक्ष केंद्रीत केले आहे़ त्यानुसार ग्राहकांची गर्दी होत असलेल्या मॉल्स, चित्रपटगृहे, शाळा-महाविद्यालये हे ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून आठवडे बाजार देखील बंद करण्यात आला आहे़ गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक व जलद गतीने होण्याची भीती असल्याने गर्दी नियंत्रण करण्यावर प्रशासनाकडून निर्बंध घालण्यात आले आहेत़ दरम्यान येथील बालाजी मंदिर २३ व २४ मार्च रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.बोराडी येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रविवारी बोराडी गावातील सर्व दुकान, हॉटेल, किराणा दुकान, अभ्यासिका, इतर व्यवहार, अन्य समारंभ, कम्युनिटी सेंटर, बिअरबार, उद्यान, आदीनी जनता कर्फ्यूमध्ये १०० टक्के सहभागी झालेत़ उपसरपंच राहुल रंधे यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी गावातील किर्तन सप्ताह कार्यक्रम रद्द करण्यात आला़ बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात येत आहे.