अखेर बसस्थानकाचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2020 12:52 IST2020-03-11T12:51:45+5:302020-03-11T12:52:13+5:30
१३ कोटी रूपये मंजूर : बीओटी तत्त्वाऐवजी एस.टी. महामंडळानेच केली कामाला सुरूवात

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर : येथील बसस्थानकाचे २०१३ मध्ये पत्र्याचे शेड असलेल्या बांधकामाला सुरूवात झाल्यामुळे नवीन बसस्थानकाच्या आशा मावळल्या होत्या़ अनेकदा नवीन बसस्थानक बीओटी तत्त्वावर करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या. मात्र, प्रत्यक्षात बांधकामाला सुरूवात झाली नाही़ अखेर एस.टी. महामंडळानेच गेल्या ३ महिन्यापूर्वी नवीन बसस्थानक बांधकामाला सुरूवात केली़ त्यासाठी तब्बल १३ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत़ २०२१ पर्यंत या अत्याधुनिक बसस्थानकाचे काम पूर्ण होणार आहे़
शिरपूर बसस्थानक सन १९७२ मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये बांधण्यात आले होते़ दरम्यान, विकसनशिल असलेल्या शिरपूर शहरात विकासाच्या अनेक पाऊल खूणा उमटल्या. परंतू येथील बसस्थानकाचे गोठा टाईप सिंमेंट पत्र्याचे शेड बदलविण्यात आले नाही़ त्यामुळे उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यात प्रवाशांचे संरक्षण होत नाही. उन्हाळ्यात हे शेड खूपच तापते. त्यामुळे या पत्र्याच्या शेडमध्ये कोणीही प्रवाशी आसरा घ्यायला तयार नसतो़ त्यामुळे हे शेड बहुधा रिकामेच असते़ प्रवाशांमध्ये विशेषता महिला व बालकांचे उन्हाळ्यात खूपच हाल होतात़ ‘बांधा व हस्तांतरीत करा’ या तत्वावर येथील बसस्थानक बांधण्यास मंजूरी मिळून बरेच वर्षे झाले. तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही़ अनेकदा निविदा देखील काढण्यात आल्या. मात्र, कामाला सुरूवात झाली नाही़ सन २०१३ मध्ये नादुरूस्त असलेले पत्र्याचे शेड पाडून त्याच जागी पुन्हा पत्राचे शेड बांधण्यात आल्यामुळे नवीन बसस्थानक बांधकामाच्या आशा मावळल्या होत्या़ गतवर्षी देखील नव्याने बांधकामासाठी निविदा काढण्यात आली. मात्र, त्यानंतरही कामाला सुरूवात झाली नाही़ अत्याधुनिक बसस्थानकासाठी अनेकदा लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले. अखेर मे २०१९ मध्ये ११ कोटी २१ लाख ६३ हजार रूपये बांधकामासाठी मंजूर झाले. या कामाचे टेंंडर निघून सुध्दा प्रत्यक्ष कामाला सुरूवात झाली नाही़ अखेर जानेवारी महिन्यात एस.टी. महामंडळानेच बीओटी तत्वावर बांधकाम न करता महामंडळामार्फतच नवीन अत्याधुनिक बसस्थानक बांधण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली़ बसस्थानक, डेपो व आगार व्यवस्थापक निवासस्थानाकरीता १३ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे़ मार्च-एप्रिल २०२१ पर्यंत हे काम पूर्ण केले जाणार आहे़ आंतरराज्य मापदंडानुसार शिरपूर बसस्थानकावर सर्व सोयीसुविधा उपलब्ध होणार आहे.
शिरपूर हे शहर गुजरात, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र यांना जोडणारे असल्याने मोठ्या प्रमाणात तीनही राज्यातील नागरिक, व्यापाऱ्यांची ये-जा असते. नवीन बसस्थानकात मातांसाठी अत्याधुनिक हिरकणी कक्ष, महिला व पुरुष चालक-वाहक यांच्यासाठी २ स्वतंत्र विश्रामगृह, आगार प्रमुख आणि कर्मचारी यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालय, आगार प्रमुखांना निवासस्थान, प्रवाशांसाठी अत्याधुनिक आसन व्यवस्था व सुविधा, माहितीसाठी डिजिटल वेळापत्रक, विमातळाप्रमाणे गाड्यांची माहिती, पर्यावरणपूरक सुलभ शौचालय, प्रवाशांना थंडगार शुद्ध पाणी, लाईट, फॅनची सुविधा यासह अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
शिरपूर-पनवेल बस
सुरूवातीपासून या आगारात शिरपूर-पनवेल बस साधी होती़ रातराणी म्हणून रात्री ८़३० वाजता सुटते़ सद्यस्थितीत आगाराने साध्या बसऐवजी शयनयान व आसनी गाडीचे नियोजन केले आहे़ जेणेकरून ३० प्रवाशी सिटींग सिटस् तर १५ सिटस् स्लीपर असणार आहेत़ मात्र या गाडीचे भाडे साध्या गाडी प्रमाणेच आकारले जात आहे़ या गाडीला प्रवाशांनी अॅडव्हान्स बुकींग करून चांगला प्रतिसाद दिला आहे. मात्र, या गाडीत कुठल्याही प्रकारची सवलत प्रवाशांना भाड्यात दिली जात नाही़
या शयनयान व आसनी गाडीला लग्न सराईत चांगले सुगीचे दिवस आले होते़
शिरपूर आगारात फक्त २ शिवशाही बसेस पुण्यासाठी दिल्या असून ती गाडी पूर्णत: एसी आहे़ मात्र ही गाडी पूर्णत: सिटींग आहे़