धुळ्यातील राम भक्तांमध्येही कोरोनाची धास्तीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 21:14 IST2020-04-02T21:13:42+5:302020-04-02T21:14:05+5:30
रामनवमी : अंतर राखून भक्तांनी घेतले दर्शन

धुळ्यातील राम भक्तांमध्येही कोरोनाची धास्तीच
धुळे : दरवर्षी रामनवमीला रामाच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी उसळते़ भक्तांच्या मोठमोठ्या रांगा लागलेल्या असतात़ ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप होत असते़ यंदा मात्र या उपक्रमाला कोरोनामुळे ब्रेक लागला़ भक्तांचीही संख्या रोडावली़
कोरोनामुळे सर्वच ठप्प झाले आहे़ या आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी पहिल्यांदाच संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे साहजिकच त्याचे पडसादही धुळ्यात चांगलेच पडले आहेत़ कोरोनाची धास्ती आता सर्वत्र घेतली जात असल्यामुळे सामान्य भक्त दर्शनासाठी येताना दिसत नाहीत़
रामनवमीला दरवर्षी आग्रा रोडवर रामाच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केलेली असते़ भक्ती गितांनी संपूर्ण आसमंत दुमदुमलेला असतो़ भक्तीपूर्ण वातावरण सर्वत्र असते़ यंदा मात्र असे काहीही नाही़
आग्रा रोडवरील रामाच्या मंदिरात अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत रामजन्म सोहळा पार पडला़ तत्पुर्वी सकाळी मुर्तीचा अभिषेक करण्यात आलेला होता़ त्यानंतर आलेल्या भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या़ दोन भक्तांमध्ये विशिष्ठ अंतर ठेवण्यात आले होते़
गर्दी होऊ नये, अंतर राखून दर्शन घेण्याच्या सूचना मंदिर प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येत होत्या़ पोलिसांचा नेहमीप्रमाणे बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता़
दरम्यान, मंदिराच्या बाहेर रामफळ विक्रीसाठी काही विक्रेते दाखल झाले होते़