एरंडोलच्या साखर व्यापाऱ्याला धनादेश अनादरप्रकरणी शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 22:35 IST2020-02-07T22:34:49+5:302020-02-07T22:35:32+5:30
धुळे न्यायालय : ७ लाख १५ हजाराचा ठोठावला दंड

एरंडोलच्या साखर व्यापाऱ्याला धनादेश अनादरप्रकरणी शिक्षा
धुळे : एरंडोल येथील साखरचे व्यापारी मनोज गोकुळदास मानुधने यांना धनादेश अनादर प्रकरणी १८ महिन्यांची शिक्षा आणि ७ लाख १५ हजाराचा दंड अशी शिक्षा धुळे येथील न्यायालयाने ठोठावली़ त्यापैकी ७ लाख रुपये या प्रकरणाचे फिर्यादी कुमार दंडवाणी यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला़
धुळे येथील जयसाई ट्रेडर्सचे संचालक कुमार जयकिशन दंडवाणी हे साखरेचे होलसेल व्यापारी आहेत़ तर एरंडोल येथील मानुधने ट्रेडींग कंपनीचे संचालक मनोज गोकुळदास मानुधने हे देखील साखरेचे होलसेल व्यापारी म्हणून काम करीत असतात़ दोन्ही साखरेचे होलसेल व्यापारी असल्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षापासून त्यांचे व्यावसायिक संबंध असल्यामुळे त्यावर विश्वास ठेवून साखरेच्या व्यवसायाकरीता साखर घेण्याकरीता एचएफडीसी बँकेच्या धनादेशद्वारे ८ लाख ८४ हजार रुपये दंडवाणी यांनी मानुधने या व्यापाºयाला दिले़ परंतु मानुधने यांनी जाणीवपुर्वक या रकमेचा माल दिलेला नाही़ पाठपुरावा करुनही साखर मिळत नसल्याने धनादेशाद्वारे पाठविलेली रक्कम परत करावी अशी मागणी दंडवाणी यांनी केली़ मात्र धनादेशाची रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात आली़ यासंदर्भात विचारणा केली असता सदर रकमेच्या परतफेडीकरीता तीन धनादेश देण्यात आले होते़ हे धनादेश नक्की वटतील अशी हमी आणि विश्वास देण्यात आला़ बँकेत हे धनादेश वटविण्यासाठी पाठविले असता खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने ते वटले नाही़ यासंदर्भात रजिस्टर नोटीस पाठविण्यात आली़ नोटीस मिळाल्यानंतरही रक्कम देण्यात आली नाही़ परिणामी कुमार दंडवाणी यांनी धुळ्यातील न्यायालयात वेगवेगळ्या तीन फिर्याद दाखल केली़ दोघेही बाजुंचे साक्षीपुरावे आणि युक्तीवाद झाल्यानंतर एरंडोल येथील साखरेचे व्यापारी मनोज गोकुळदास मानुधने हे दोषी आढळल्याने न्यायाधीश एम़ एम़ निकम यांनी १८ महिन्यांची शिक्षा आणि ७ लाख १५ हजाराचा दंड ठोठावला़ तसेच नुकसान भरपाई म्हणून ७ लाख रुपये द्यावेत़ दंडाची रक्कम न भरल्यास पुन्हा तीन महिन्यांची शिक्षा ठोठावली़ या निकालाकडे लक्ष लागले होते़
याप्रकरणाचे फिर्यादी कुमार जयकिशन दंडवाणी यांच्यातर्फे अॅड़ नितीन लक्ष्मण रायते यांनी काम पाहीले़ त्यांना अॅड़योगेश सावळे, अॅड़ ललित देठे आणि अॅड़ अतुल अहिरे यांनी मदत केली़