लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : एस.टी.चा प्रवास सुखाचा व मनोरंजनाचा करण्याच्या दृष्टीने अॅन्ड्रॉइड मोबाईलधारक प्रवाशांना एस.टी. महामंडळातर्फे मोफत वायफाय (हॉटस्पॉट) सेवा पुरविण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या मोबाईलवर चित्रपट, मालिका व गाण्यांचा आनंद घेता येत होता. मात्र अडीच वर्षाच्या कालावधीतच ही सेवा कोलमडलेली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या मनोरंजनावर पाणी फिरले आहे. आज काही बसेसमध्ये वायफायचे यंत्र असूनही त्याचा उपयोग होत नाही. तर नूतनीकरण करण्यात आलेल्या बसगाड्यांमध्ये हे यंत्रच लावण्यात आलेले नाही. खाजगी बसगाड्यांच्या स्पर्धेत राज्य परिवहन महामंडळाची बस मागे पडू लागल्याने प्रवाशांनीही महामंडळाच्या बसकडे पाठ फिरविली. त्यामुळे प्रवाशांना बसकडे आकृष्ट करण्यासाठी प्रवासादरम्यान प्रवाशांची करमणूक व्हावी या उद्देशाने एस.टी.मध्ये वायफाय सेवा सुरू करण्याचा निर्णय एस.टी. महामंडळाने घेतला. जानेवारी २०१७ पासून महामंडळाने आपल्या बसेसमध्ये वाय-फाय सुविधा सुरू केली होती. ही सुविधा मुंबईच्या एका कंपनीमार्फत पुरविण्यात येत होती. यासाठी बसमध्ये वायफायचा एक बॉक्स बसमध्ये लावण्यात आला होता. त्यामुळे मोफत इंटरनेट सेवा उपलब्ध होऊन, मोबाईलवर चित्रपट, मालिका, हिंदी गाणी आदींच्या माध्यमातून प्रवाशांचे मनोरंजन करण्यात येत होते. धुळे विभागात मार्च २०१७ पासून वाय-फाय यंत्र बसविण्यास सुरवात झाली होती. धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा, दोंडाईचा या आगाराच्या एकूण ४७४ बसगाड्या असून, यातील बहुतांश बसेसमध्ये हे यंत्र बसविण्यात आले होते. सुरवातीला या मोफत वायफाय सेवेला चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र कालांतराने त्याचे आकर्षण कमी झाले. आता प्रत्येकाकडे अॅन्ड्रॉइड मोबाईल असून, अनेकजण स्वत:च्याच मोबाईलद्वारे चित्रपट, मालिका, गाणी एकेत असल्याने, या यंत्राचा फारसा उपयोग होत नसल्याचे दिसून आले. आता तर ही सेवाच कोलमडली असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत. नवीन बसेसमध्ये यंत्रच नाहीदरम्यान महामंडळातर्फे जुन्या गाड्यांचेच नुतनीकरण करून त्यांना ‘लक्झरी’सारखा लूक देण्यात आलेला आहे. या नवीन चेसीसच्या गाड्यांमध्ये हे यंत्रच लावण्यात आलेले नाही. त्याचबरोबर ‘शिवशाही’तही हे यंत्र नाही.
एस.टी.तील मनोरंजन सेवा फक्त नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:28 IST