सोशल डिस्टन्सिंग ठेवत भाविक नतमस्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 22:27 IST2020-04-08T22:26:55+5:302020-04-08T22:27:22+5:30
श्री एकवीरा देवी यात्रौत्सव रद्द : हनूमान जयंतीनिमित्त कार्यक्रम रद्द; देशावरील ‘कोरोनाचे संकट जावू दे’ ची केली प्रार्थना

dhule
धुळे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा लॉकडाऊन केला आहे़ त्यामुळे सण, धार्मिक उत्सव, यात्रौत्सव, लग्नसमारंभ रद्द करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा धुळेकरांना पहिल्यांदा चैत्र नवरात्रौत्सव तसेच हनूमान जयंती भाविकांना साजरी करता आली नाही.
देशात कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाकडून विविध उपाय-योजना केल्या जात आहे़ नागरिकांना देखील विषाणू संसर्ग टाळण्यासाठी घरात राहण्याचे आवाहन केले जात आहे़ या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी घराबाहेर जाणे टाळल्याने शहरातील रस्ते व परिसरात शुकशुकाट दिसुन येत आहे़
सोशल डिस्टन्सिंग नतमस्तक
दरवर्षी शहरातील गल्ली नं. २ मधील श्री लालबाग हनुमान मंदिरात दरवर्षी जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम होतात़ मात्र यंदा देश कोरोेनाच्या संकटात सापडल्याने मंदिर प्रशासनाने जयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे जयंतीपूर्वीच कार्यक्रम रद्द झाल्याची सुचना लावण्यात आली होती़ बुधवारी हनुमान मंदिरात भाविकांची दर्शनासाठी तुरळक गर्दी दिसुन आली़ तर काही मंदिर बंद असल्याने मंदिराबाहेरूनच भाविकांनी दर्शन घेतले़
शहरातील वाडीभोकर रोडवरील दक्षिण मुखी मारूती मंदिर, पांझरा किनारी असलेले पंचमुखी हनुमान मंदिर, पारोळा रोडवरील नवसाचा मारूती, मिल परिसरातील सोन्या मारूती मंदिर, अहिल्या देवी नगरातील मारूती मंदिरातील कार्यक्रम रद्द झाले आहेत़
मंदिर परिसरात शुकशुकाट
चैत्र नवरात्रौत्सवानिमित्त दरवर्षी हनुमान जयंतीपासून श्री एकवीरा देवीची यात्रौत्सवा प्रारंभ होत असतो. यात्रौत्सवात हजारो भाविक राज्यभरातून दाखल होतात़ देवीचा नवस, जाऊळ, शेळी उतरविण्यासाठी भाविकांची परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होते़ त्यामुळे मंदिराचा परिसर चैत्र महिन्यात गजबजलेला असतो़ मात्र यंदा कोरोनामुळे यात्रौत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारी अनेकांनी घरीच जाऊळ काढून देवीची पुजा केली़
सोशल डिस्टन्सिंगद्वारे आरती
मंदिरात मंगळवारी व बुधवारी श्रीएकवीरा देवी मंदिरात भाविकांनी गर्दी न करतांना सोशल डिस्टन्सिंग पाळत देवीची आरती केली़ यावेळी अनेकांनी देवीकडे देशावर आलेले संकट दुर होण्याचे साकडे घातले़
मंदिर पसिरात देवीची मिरवणूक
यात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी हनुमान जयंतीला शहरात श्री एकविरादेवीची वाजतगाजत पालखी शोभायात्रा काढली जाते. शहरातील प्रमुख मार्गावरुन ही पालखी रात्री उशीरा मंदिरात पोहचते. पालखीचे शहरात ठिकठिकाणी स्वागत व आरती केली जाते. यंदा मात्र शोभायात्रा रद्द करण्यात आली होती. परंपरा खंडीत होऊ नये यासाठी मंदिर परिसरातून बुधवारी पालखी फिरवून परत मंदिरात आणण्यात आली. पालखी सोबतही पुजारी सोशल डिस्टन्सिंग ठेऊन चालत होते.