आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:02+5:302021-09-05T04:41:02+5:30
धुळे : आदिवासी भागात नऊ ते दहा वर्षांपासून कार्यरत असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण ...

आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी प्रयत्न
धुळे : आदिवासी भागात नऊ ते दहा वर्षांपासून कार्यरत असून आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या बौद्धिक पातळीत वाढ करण्याच्यादृष्टीने काम करत आहे. त्याचेच फलित आहे की, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आता शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे. आपण हे काम अविरत पुढेही सुरू ठेवणार असल्याचे मनोगत आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त बोराडी (ता. शिरपूर) येथील जि. प. शाळेतील शिक्षिका जागृती शिवदास निकम यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
सुरुवातीला साडेचार वर्षे शिरपूर तालुक्यातील बोराडी येथे जिल्हा परिषद शाळेत काम करताना आदिवासी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांशी जवळून संबंध आला. तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की, केवळ बोलीभाषेची अडचण सोडली, तर ते सुद्धा हुशार असतात. त्यांच्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या बौद्धिक पातळीत वाढ करण्याच्यादृष्टीने आपण प्रयत्न केले. त्यांना हसत-खेळत आणि विविध उपक्रम राबवून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल, यादृष्टीने प्रयत्न केले. त्यात यशही आले. आता यापुढे सुद्धा आदिवासी क्षेत्रात कार्यरत राहण्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.
आदिवासी क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये हळूहळू शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे. मात्र त्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्यात त्यांच्या पालकांचा मोठा हात आहे. ते मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी शेतात कामावर नेण्यावर जास्त भर देतात. त्यामुळे पालकांना मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व कळविण्याच्या आणि त्यांच्यात जनजागृती करण्याच्यादृष्टीने शासनातर्फे प्रयत्न झाले पाहिजेत. मी यावरच गेल्या दहा वर्षांपासून काम करीत आहे. आता पालकांमध्ये मुलांच्या शिक्षणाचे महत्त्व कळू लागले आहे. त्यासाठी मी प्रत्यक्ष पालकांना भेटून चर्चा करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व कळवून देण्याचा प्रयत्न केला. यात मला यशही आले. त्या कार्यामुळेच मला आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला आहे. यापुढेही आपण आदिवासी क्षेत्रातच काम करणार आहोत.
- जागृती निकम, आदर्श शिक्षिका