बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न३०,३१ मार्चला आॅनलाईन रोजगार मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:50+5:302021-03-27T04:37:50+5:30
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन धुळे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे यांच्यातर्फे ३० आणि ३१ ...

बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न३०,३१ मार्चला आॅनलाईन रोजगार मेळावा
ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन
धुळे : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे यांच्यातर्फे ३० आणि ३१ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतीने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. धुळे जिल्हयातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असून मुलाखती व्हीडीओ कॉन्फरन्स, स्काइप, व्हाटस्अॅप, झूम, गूगल मीट तसेच मोबाईल, दूरध्वनीव्दारे घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे मागील काही महिन्यांपासून औद्योगिक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. त्यामुळे या आस्थापनांमध्ये काम करणारे परप्रांतीय, स्थानिक कामगार, मजूर हे त्यांचे गावी निघून गेले आहेत किंवा जात आहेत. औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यासाठी नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांकरीता ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे वेब पोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात येणार आहे. यासाठी वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि मेळाव्यास ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या व्हीडीओ कॉन्फरन्स तसेच मोबाईल दूरध्वनीव्दारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. या संधीचा जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी वेबपोर्टलला लॉगइन करावे. नोकरी इच्छुक उमदेवारांनी अद्याप पर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास वेब पोर्टलवर किंवा अँड्राईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअर मधून महास्वयम हे मोफत ॲप डाऊनलोड करुन नोंदणी करावी, तसेच लॉग करुन मेळाव्यातील उपलब्ध रिक्तपदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे.
भरती इच्छुक उद्योजक यांनी जास्तीत जास्त रिक्तपदे वेब पोर्टलवर अधिसूचित करावीत. याबाबत काही अडचण असल्यास या कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त इच्छुक नियोक्ते आणि बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने लाभ घ्यावा. सदर मेळावा ऑनलाईन असल्यामुळे उमेदवारांनी कार्यालयास किंवा नियोक्त्यांकडे प्रत्यक्ष उपस्थित राहून गर्दी करु नये, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. रा. म. कोल्हे यांनी केले आहे.