मासिक पाळीबाबत प्रभावी जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2020 22:53 IST2020-06-03T22:53:26+5:302020-06-03T22:53:48+5:30
महिला आर्थिक विकास महामंडळ : जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनी उपक्रम

dhule
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रम तेजस्विनी अभियान, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागात प्रभावी जनजागृती करण्यात आली़
शहरी तसेच ग्रामीण भागात जाणीव जागृतीपर कार्यक्रम राबवून सीएमआरसी स्तरावरुन अस्मिता योजने अंतर्गत सॅनीटरी पॅड वाटप करण्यात आले़ मासिक पाळीत स्वच्छतेचे महत्व विशद करुन उपाययोजनांबाबत महिलांना माहिती देण्यात आली़
गृहभेटी देवून किशोरवयीन मुलींना व महिलांना मासिक पाळीविषयी मार्गदर्शन केले़ महिलांना स्वस्त दरात पॅड वाटप केले़ गरिब महिलांना व किशोरवयीन मुलींना मोफत पॅडचे वाटप केले़ मुलींना पॅड मॅन चित्रपट व मासिक पाळी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले़
या उपक्रम अंतर्गत उन्नती गटातर्फे १०० पॅड वाटप करण्यात आले़ कल्पतरु गटातर्फे १८०, दिशा ३०, प्रेरणा ३०, आधार १२० आणि श्रमसाफल्य ३३ असे एकूण ४९३ सॅनीटरी पॅड वाटप करण्यात आले़
मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रीया आहे़ यामुळे मातृत्वाचा अनुभव घेता येतो़ मात्र आपल्याकडे याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज पसरले आहेत़ जागतिक आरोग्य संघटनेने २८ मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून जाहीर केला आहे़ हा दिवस अनेकांना माहित नसला तरी जागतिक स्तरावर त्याला फार महत्व आहे़
लक्षावधी महिला व मुली या कालावधीमध्ये पूर्ण क्षमतेने काम करु शकत नाहीत़ त्यामुळे जागतिक स्तरावर ही संकल्पना उदयास आली़ समाजाचा दृष्टीकोन बदलण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो़
मासिक पाळी स्वच्छता दिनाची सुरूवात प्रथम जर्मनीमध्ये झाली़ ‘वॉश युनायटेड’ या संस्थेने २८ मे २०१४ मध्ये केली़ तेव्हापासून हा दिवस जागतिक स्तरावर मासिक पाळी स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो़