ई-पाॅसवरील अंगठ्याला महिनाभर स्थगिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST2021-05-05T04:58:46+5:302021-05-05T04:58:46+5:30

धुळे : मोफत धान्याच्या वितरणावेळी रेशन दुकानांवर गर्दी उसळणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून ई-पाॅस मशिनवरील ग्राहकांच्या ...

E-Pass thumbs up for a month! | ई-पाॅसवरील अंगठ्याला महिनाभर स्थगिती!

ई-पाॅसवरील अंगठ्याला महिनाभर स्थगिती!

धुळे : मोफत धान्याच्या वितरणावेळी रेशन दुकानांवर गर्दी उसळणार असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेवून ई-पाॅस मशिनवरील ग्राहकांच्या अंगठ्याला शासनाने महिनाभरासाठी स्थगिती दिली आहे. दरम्यान, ही एक मागणी मान्य झाली असली तरी इतर मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा संप सुरूच आहे.

गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे ऐन मोफत धान्य वितरणाच्या वेळी दुकाने बंद आहेत. ई-पाॅस मशीनवर प्रत्येक रेशनकार्ड धारकाचा अंगठा घेतल्यास कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असल्याने केवळ दुकानदाराचा अंगठा ग्राह्य धरावा अशी दुकानदारांची मागणी होती. ही मागणी एक महिन्यासाठी शासनाने मान्य केली आहे.

दरम्यान, रेशन दुकानांवर मोफत धान्याचा साठा पोहोचविण्याचे काम पुरवठा विभागाने सुरू केले आहे. धान्यसाठा उचलण्याची आणि पोहोचविण्याची प्रक्रिया ऑनलाईन असल्याने काही दुकानांवर धान्य पोहोचले आहे तर काही दुकानांवर अजून धान्यसाठा नाही.

रेशन दुकानावर सॅनिटायझर

धान्य वितरण करताना ई-पाॅसवरील अंगठ्याला स्थगिती मिळाली असली दुकानदारांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. दुकानाच्या बाहेर त्यांना सॅनिटायझरची व्यवस्था करावी लागेल. दोन वेळा मोफत धान्य वितरण करावयाचे असल्याने सॅनिटायझरचा खर्च वाढेल.

रेशन दुकानदारांना ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच द्यावे ही प्रमुख मागणी आहे.

धान्य वितरणाच्या वेळी रेशन दुकानावर गर्दी होते. ग्राहकांच्या गराड्यात दुकानदारांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. वर्षभरात राज्यात २५ तर जिल्ह्यात ४ रेशन दुकानदारांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

धान्य वितरणाला विरोध नाही. परंतु स्वत:च्या जीवाची आणि कुटुंबाची पर्वा न करता गरजूंना धान्य वितरणाचे काम दुकानदार करीत आहेत. त्यामुळे शासनाने दुकानदारांच्या जीवाची पर्वा करावी. न्याय्य हक्कांसाठी संप पुकारला आहे. एक मागणी मान्य केली आहे. इतरही मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा रेशन दुकानदारांचे नेते महेश घुगे, संतोष जैन यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यातील लाभार्थी कार्डसंख्या २,९३,३१४

अंत्योदय ७६,९७६

प्राधान्य कुटुंबे २,१६,३३८

Web Title: E-Pass thumbs up for a month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.